|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पाश्चिमात्त्य ‘डे’ संस्कृतीत तरुणाईचा जल्लोष…

पाश्चिमात्त्य ‘डे’ संस्कृतीत तरुणाईचा जल्लोष… 

गणेश तारळेकर/       सातारा

प्रेम म्हणजे समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार, आणि निभावलं तर जीवन असतं…अशा अनेक शब्दांचा सोशल मीडियावर अगदी भस्मासुर झालायं…अर्थात निमित्त आहे, ते व्हॅलेंटाईन डे चं…ज्याची तरुणाई अगदी डोळय़ांत तेल घालून वाट बघत असते. या काळात आनंदाला अगदी उधाण आलेलं असतं…अगदी दूध उतू गेल्यासारखं…

पणं…प्रेम हा नुसता दोन अक्षरी शब्द नाही. तर, एकमेकांमध्ये विलीन होण्याचा, सामावून जाण्याचा मंत्र आहे. प्रेमात ना कुठल्या नात्याची गरज असते, ना कुठल्या भावनांची गरज असते. गरज असते ती फक्त एकमेकांसाठी जगण्याची, त्यासाठी समर्पण करण्याची.

रोझ डे पासून ब्रेक अप डे

आता फक्त व्हॅलेंटाईन डे चीच प्रेझ राहिलेली नाही. तर, 7 फेब्रुवारीपासून रोझ डे पासून सुरु झालेला हा उत्सव 21 तारखेपर्यंतच्या ब्रेक अप डे पर्यंत प्रामुख्याने तरुण वर्गाच्या साक्षीने चालणार आहे. यावेळी आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तिंवर खास शुभेच्छांचा वर्षाव केला जाणार आहे, भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी.

तरुणाईची लगबग अन् धडपड

 आलेल्या विविध डे च्या निमित्ताने भेटवस्तू आणि ऑनलाईन शुभेच्छा देण्यात तरुणवर्गाची मोठी लगबग आणि धडपड आहे. सगळय़ांत आधी मीच अपडेट आहे, हे सिद्ध करण्याचा हा होत असलेला केविलवाणा प्रयत्न.

शेवटी ‘प्यार का इजहार करने के लिए… वाट्टेल ते. म्हणूनच हे सगळं करण्याचं भीमकृत्य.

सोशल मीडियावर ट्राफीक जाम…

फेसबुक, व्हॉट्स ऍप, शेअरचॅट, इन्स्टाग्राम आदींवर या डे च्या निमित्तानं अनेक फोटो, व्हिडीओ, संदेश, स्टेटस व्हायरल होत आहेत. त्यामुळे जसं रस्त्यावरं गर्दी झाल्यावर ट्राफीक जाम होतं अगदी तशीच परिस्थिती सोशल मीडियावर निर्माण झाली आहे. आता जिओने यासाठी वेगळी ऑफर ठेवली तर नवल वाटायला नको…

सेनानींची 14 रोजी आठवण

14 फेब्रुवारी याच दिवशी लाहोर येथे शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या स्वातंत्र्यसेनानींना इंग्रज सरकारने फाशीची शिक्षा सुनावली होती. या हुतात्म्यांची आठवण या दिवशी युवकांना असायला हवी आणि तशा प्रकारचा संदेशही फेसबुक, व्हॉट्स ऍप, शेअरचॅट, इन्स्टाग्रामसारख्या अशा अनेक सोशल माध्यमांतून शेअर व्हायला हवा.