|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाळवंटीच्या घाटावर आज महाआरती

वाळवंटीच्या घाटावर आज महाआरती 

प्रतिनिधी/ सांखळी

वाळवंटी नदीत होणारे प्रदूषण रोखणे तसेच उत्तर गोव्यासाठी जीवनदायिनी ठरणाऱया या नदीबद्दल तीर्थक्षेत्राची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने आज मंगळवारी रथसप्तमीच्या शुभदिनी वाळवंटीच्या घाटावर भव्य दिव्य अशा थाटात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त वाळवंटी घाट पताकांनी सजविण्यात आला आहे. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून भरगच्च कार्यक्रमांचे वाळवंटी किनारी आयोजन करण्यात आले आहे. सांखळी व पंचक्रोशीतील महिला तथा सुविसिनींतर्फे सायंकाळी श्रीविठ्ठलाची महाआरती वाळवंटी किनारी सादर केली जाईल. 15 जानेवारी पासून सुरू झालेल्या मकरसंक्रांती उत्सवाचीही आज सांगता होणार आहे. पंढरपूर येथे चंद्रभागेमध्ये आज श्रीविठ्ठलाच्या नावाने पाण्यात दिवे सोडले जातात.

सांखळीची वाळवंटी ही येथील श्रीविठ्ठलाच्या चरणाकडून निघते. पुंडलिकाच्या मंदिराच्या बाजूला असलेला हा घाट वाळवंटीमध्ये स्नान करून भक्त मंडळी श्रीविठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यास उपयुक्त ठरणार अशा पद्धतीने 400 वर्षांपूर्वी त्याची रचना करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात श्रीविठ्ठलाच्या चरणाकडून वाहणाऱया या पवित्र गंगेमध्ये प्रदूषण होत असल्याने हे प्रदूषण टाळावे आणि वाळवंटी मायबद्दल भक्तिभावना दृढ व्हावी या शुद्धअंतःकरणातून ’वाळवंटी माय’ तर्फे आज सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास सायं. 5 वाजता गंगा पूजनाने होईल. त्यानंतर स्थानिक बालकलाकारांतर्फे सायं. 5.30 वाजता स्वागत गीत सादर केले जाईल. वाळवंटीचे संवर्धन या विषयावर समाजसेवक गोपिनाथ गावस हे यावेळी विचार व्यक्त करतील.

दिग्गजांची उपस्थिती

या कार्यक्रमास सभापती डॉ. प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री तथा श्रीविठ्ठल पंचायतन देवस्थानचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे, स्थानिक आमदार प्रविण झांटय़े, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष अंकिता नावेलकर, तसेच स्थानिक पंच रश्मी नाईक याशिवाय डिचोलीचे मामलेदार प्रविणजय पंडित, स्थानिक पोलीस निरीक्षक तसेच सांखळी पंचक्रोशीतील पंच, सरपंच, नगरसेवक इत्यादी उपस्थित राहणार आहेत.

सायं. 6 वाजता सौ. जान्हवी बोंद्रे यांच्या सिद्धकला अकादमीतर्फे विद्यार्थीनी कथ्थक नृत्य सादर करतील. त्यानंतर डॉ. सावंत, श्री. राणे, श्री. झांटय़े विचार मांडतील. तसेच पानवेलकर भजनी मंडळातर्फे भजन आणि त्यानंतर श्रीविठ्ठलाची महाआरती होईल व तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. यावेळी सांखळी व पंचक्रोशीतील मंडळी वाळवंटीच्या संवर्धनासाठी शपथग्रहण करतील.

वाळवंटीवर आलेले संकट लक्षात घेऊन उत्तर गोव्यात तमाम जनतेची तृष्णा भागविणाऱया या नदीच्या संवर्धनासाठी सर्वांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. राणे व डॉ. सावंत यांनी केले आहे.