|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राजकारण्यांनी बाल व महिलांवरील गुन्हय़ात हस्तक्षेप करू नये

राजकारण्यांनी बाल व महिलांवरील गुन्हय़ात हस्तक्षेप करू नये 

प्रतिनिधी/ मडगाव

सांगे येथील एका अल्पवयीन मुली लैगिक अत्याचार झाले होते. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून सद्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ बनले आहे. मात्र, या प्रकरणात प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ऍड. प्रतिमा कुतिन्हो या राजकारण आणत असून हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. राजकारण्यांनी बाल व महिलांवरील गुन्हय़ात हस्तक्षेप करू नये अशी मागणी बायलांचो एकवोटच्या अध्यक्षा श्रीमती आवदा व्हियेगस यांनी केली आहे.

प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी सदर मुलीच्या घरी भेट देऊन मुलीच्या आईसोबतची छायाचित्रे प्रसार माध्यमांपर्यंत पोचविली होती. एखाद्या मुलीवर लैगिक अत्याचार होतात. तेव्हा तिची ओळख सिद्ध करता येत नाही. आणि ओळख सिद्ध केल्यास तो गुन्हा ठरतो. सांगेतील प्रकरणात प्रतिमा कुतिन्हो यांनी कायद्याचे भान न ठेवता कृती केली. त्यामुळे पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो यांच्या विरूद्ध ‘पॉस्को’ कायदा लावला. त्यात गैर असे काहीच नाही असे श्रीमती व्हियेगस म्हणाल्या.

‘पॉस्को’ कायदा मागे घ्यावा यासाठी प्रतिमा कुतिन्हो यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी हे प्रकरण सद्या न्यायप्रविष्ठ असल्याने ही कृती देखील चुकीच ठरते असे श्रीमती व्हियेगस यांनी स्पष्ट केले. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो या वकील आहेत. त्यामुळे त्यांनी आत्ता स्वता न्यायालयात जाऊन तक्रारीतून आपले नाव गाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी इतरांची मदत घेऊन नये असा सल्ला देखील श्रीमती व्हियेगस यांनी दिला आहे.

पॉस्को कायदा अंमलात यावा यासाठी ‘एनजीओ’नी महत्वाची भूमिका बजावली होती. लैगिक अत्याचारातील व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली पाहिजे. त्याची ओळख प्रसार माध्यमांतून होता कामा नये. यासाठीच हा कायदा करण्यात आलेला आहे असे श्रीमती व्हियेसग म्हणाल्या.

सांगे येथील प्रकरणात विनाकारण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व त्यांच्या मुलाला गुंतविले जाते. त्यांनी या प्रकरणात कोणताच हस्तक्षेप केलेला नाही. आपण स्वता या प्रकरणी पोलीस तक्रार नोंद केली होती व मुलीची जबानी घेताना पोलीस स्थानकात उपस्थिती लावली होती. त्यावेळी सुद्धा कोणताच दबाव आणला नव्हता. पोलीस तक्रार नोंद झाल्यानंतर, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली व एक महिना तो पोलीस कोठडीत होता. त्याची सद्या जामीनावर सुटका झालेली आहे.

या प्रकरणी न्यायालयात आरोप पत्र दाखल झाले असून त्यावरील सुनावणी होणार असल्याची माहिती आवदा व्हियेगस यांनी दिली. प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना त्यावर भाष्य करता येत नाही. हे प्रतिमा कुतिन्हो यांना ठाऊक असले पाहिजे. त्या राजकारणी असून त्यांनी नको, त्या विषयात हस्तक्षेप करू नये असा सल्ला देण्यात आला आहे.