|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बेतीतील तरुण मारहाण प्रकरणातील आरोपी मोकाट

बेतीतील तरुण मारहाण प्रकरणातील आरोपी मोकाट 

पणजी / प्रतिनिधी

बेती येथे फातर्पेकर नावाच्या एका नागरिकाला पर्वरीतील 4 जणांनी बेदम मारहाण तर केलीच शिवाय त्या नाराधमांनी त्याचे शुटिंग करुन सोशल मीडियावर  व्हायरल केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस राजकीय दबावाखाली वावरत असल्याचे सिद्ध होत आहे.

गेल्या आठवडय़ात झालेल्या या घटनेचे सोशल मीडियावरून वृत्त सर्वत्र व्हिडीओद्वारे पसरल्यानंतर जनतेत संताप पसरला. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे पर्वरी पोलीस गप्प बसलेले आहेत.

मारहाण झालेला भाजपचा कार्यकर्ता

ज्याला मारहाण झाली तो सत्ताधारी भाजपचा कार्यकर्ता आहे, असे असून देखील पोलिसांनी फारशी दखल घेतली नाही. सदर व्यक्तीला मारहाण झाल्यानंतर तो एवढा घाबरला की पोलीस स्थानकावर जाण्यासही घाबरला. काही मित्रांनी मदत केल्यानंतर व स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्यानंतर पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली.

प्रत्यक्षात मात्र ज्यांनी मारहाण केली ती माणसे समोर दिसत आहेत, असे असून पोलीस मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करीत नसल्याने गुंड मंडळी मोकाट सुटलेली आहे. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले की, निश्चितपणे पोलिसांवर राजकीय नेत्याचा दबाव आहे. त्यामुळेच पोलीस संबंधितांवर कारवाई करण्यास तयार नाही. सदर व्यक्तीला मारहाण करून कायदा हातात घेणाऱयांना कोण राजकीय नेता पाठिशी घालीत आहे हे समजत नाही. मात्र अकारण पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि बदनामी होत होत आहे.

पर्वरीत या संपूर्ण प्रकाराने दहशत पसरलेली असून ताळगाव व सांताक्रूझ प्रमाणेच आता पर्वरीतही गुंडगिरी सुरु झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस दखल घेण्यास तयार नसल्याने पर्वरीतील जनतेत तीव्र संताप पसरलेला आहे.