|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अखेर खाण लिलावासाठी हालचाली

अखेर खाण लिलावासाठी हालचाली 

प्रतिनिधी/ पणजी

खाणींच्या प्रश्नावर गेले वर्षभर गोव्यातील गल्लीपासून केंद्रातील दिल्लीपर्यंत सर्वांचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर आता सरकारने खाणींच्या ब्लॉकांचा लिलाव करण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून त्यावर चर्चा करण्याकरता राज्य भूगर्भ मंडळाची बैठक आज मंगळवारी बोलावली आहे. खाणींशी संबंध येणाऱया विविध खात्यांच्या प्रतिनिधींना त्यासाठी खाण खात्याने पाचारण केले आहे. शेवटी खाणींचा लिलाव करण्याच्या दिशेने आता सरकारची पावले पडत असल्याचे संकेत मिळत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने खाणी बंद करण्याचा निकाल देताना त्यांचा लिलाव करण्याचा पर्याय दिला होता. त्यावर गोव्यात फारसा गांभिर्याने विचारच झाला नाही. विधानसभेत खाण प्रश्नावर ठराव मंजूर करणे, धरणे, निदर्शने करुन आवाज उठवणे, दिल्लीला शिष्टमंडळ पाठवणे तसेच तेथे आंदोलन करणे असे सर्व प्रकार झाल्यानंतर काहीच तोडगा निघाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलिकडेच शिष्टमंडळ भेटले आणि त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नुकतेच गोव्यात येऊन गेले. त्यांनी गोव्यातील खाण प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. गेले वर्षभर फक्त आश्वासनेच मिळत आहेत. तोपर्यंत खाण खाते गप्पच राहिले आणि आता काहीच तोडगा निघत नाही हे समजून आल्यानंतर खाण खात्याने खाणींच्या  ब्लॉकांचा लिलाव करणे शक्य आहे किंवा नाही यावर चर्चा करण्यासाठी जिओलॉजिकल बोर्डाला बैठकीसाठी पाचारण केले आहे.

बैठकीत लिलावाबात होणार चर्चा

एरव्ही या बोर्डची बैठक गेले अनेक महिने झालेलीच नाही, कारण चर्चा करण्यासाठी मोठा असा विषयच नव्हता. परंतु आता राज्यातील खाणबंदीची खाण खात्याने गंभीर दखल घेतली आहे. खाणींचा लिलाव करण्याचा मार्ग कितपत योग्य आहे, लिलाव केला तर त्याचे किती फायदे – तोटे होणार आहेत यावर बोर्डाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

 गेले वर्षभर खाणबंदीच्या प्रश्नावर गोव्यात जे काही घडले त्यावरच आपण भाष्य केले आहे. खाणग्रस्तांना भडकवून लावण्याचा प्रश्नच येत नाही, जे काही घडले तेच सत्य सांगत आलेलो आहे. पंतप्रधानाच्या भेटीत जे काही झाले, तेच खरे ते लोकांना, प्रसार माध्यमांना सांगितले, असे पुती गावकर म्हणाले.

तर वर्ष वाया कशाला घालवले : पुती गावकर

मायनिंग पिपल्स प्रंटचे नेते पुती गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार खाणींच्या ब्लॉकांचा जर सरकारला लिलाव करायचा असेल तर त्यासाठी वर्ष वाया कशाला घालवले? तसेच विधानसभेत एकमताने ठराव कशासाठी संमत केला अशी विचारणा त्यांनी स्वतःहून केली आहे. सरकारने तोडगा काढतो म्हणून वर्ष वाया घालवले आहे. तोडगा काढण्याचे काम सरकारचे तसेच खासदार, आमदारांचे आहे. प्रामुख्याने सत्ताधारी पक्षांचे आहे. ते काम पंट किंवा खाणग्रस्तांचे नाही, असेही गावकर यांनी स्पष्ट केले आहे.