|Tuesday, April 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावर 18 लाखांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर 18 लाखांचे सोने जप्त 

महिलेने पँटच्या कंबरपट्टय़ात लपविले होते सोने

प्रतिनिधी/ वास्को

दाबोळी विमानतळावर काल सोमवारी महिला हवाई प्रवाशाकडून 18 लाख रूपये किंमतीचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. कस्टम विभागाच्या दाबोळीतील  पथकाने ही कारवाई केली. जीन पँटच्या कंबरपट्टय़ात लपवून एका महिला प्रवाशाने हे सोने दुबईतून भारतात आणले होते. त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. हे सोने 590 ग्रॅम वजनाचे आहे.

  सोमवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानाने दुबईहून गोव्यात उतरलेल्या एका महिला प्रवाशाबाबत कस्टमच्या अधिकाऱयांना संशय आल्याने त्यांनी तिची झडती घेतली असता, तिच्याकडे 590 ग्रॅम सोने सापडले. हे सोने त्या महिलेने एका पारदर्शी पॉलिथिन पॅकेटमध्ये बंद करून आपल्या जीन्स पॅन्टच्या कंबरपट्टय़ात खास पध्दतीने तयार करण्यात आलेल्या कप्प्यात लपवले होते. हे सोने पेस्टच्या स्वरूपात होते. मात्र, कस्टम अधिकाऱयांना संशय आल्याने तिचा तस्कारीचा प्रयत्न फसला. तिच्याकडून तस्करीचे सोने जप्त करण्यात आलेले असून तिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 18 लाख रूपये एवढी आहे.

साहाय्यक कस्टम आयुक्त डॉ. राघवेंद्र पी. यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टम अधिकारी व कर्मचाऱयांनी ही कारवाई केली. कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

गेल्या अकरा महिन्यात 236 लाख रूपयांचे सोने जप्त

कस्टम विभागाच्या दाबोळीतील तज्ञ पथकाने एप्रिल 2018 पासून केलेल्या कारवाईत आतापर्यंत 236.5 लाख रूपये किंमतीचे सोने तर 67.5 लाख रूपये किंमतीचे विदेशी चलन जप्त करण्यात आलेले आहे.

Related posts: