|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुशोभिकरणानंतर जनावरांना भेडसावणार पाण्याची समस्या

सुशोभिकरणानंतर जनावरांना भेडसावणार पाण्याची समस्या 

@ बेळगाव / प्रतिनिधी

कणबर्गी येथील तलावाच्या सुशोभीकरणासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. या तलावाच्या कामास गेल्या महिन्यात सुरू करण्यात आले होते. मात्र जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन कणबर्गी ग्रामस्थांच्यावतीने सोमवारी महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांची भेट घेवून दिले. याची माहिती स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यालयाला कळविण्यात येईल. असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिली.

सुशोभीकरणासाठी पाच कोटीचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या अंतर्गत तलावाच्या सभोवती संरक्षक भिंत बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचप्रमाणे तलावाच्या मध्यभागी माती टाकून दोन तलाव निर्माण करण्यात येत आहेत. या तलावामध्ये बोटींग सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. तलावाच्या विकासाला स्थानिक नागरिकांचा विरोध नाही. मात्र या तलावातील पाण्याचा वापर जनावरांना पिण्यासाठी, त्याचप्रमाणे शेतीसाठी व जनावरांना धुण्यासाठी केला जातो. संपूर्ण तलावाभोवती संरक्षक भिंत बांधल्यास जनावरांना पाणी कसे पाजणार असा प्रश्न शेतकऱयांना भेडसावत आहे. कणबर्गी येथील 800 हून अधिक कुटुंबांकडे जनावरे आहेत. अनेक कुटुंबे दुग्ध व्यवसाय करतात. जनावरांवर उदरनिर्वाह चालतो. जर जनावरांना पोसण्यासाठी पाणीच मिळत नसल्यास काय करायचे, अशी समस्या भेडसावत असल्याची माहिती शेतकऱयांनी महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांना यावेळी दिली. याठिकाणी तलावाचा विकास करावा, मात्र जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. जर याची दखल न घेतल्यास गावातील दोन हजारहून अधिक जनावरे मुख्य रस्त्यावर थांबवून रास्ता रोको करू, असा इशारा यावेळी शेतकऱयांनी आयुक्तांना दिला. यामुळे शेतकऱयांच्या समस्येचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

निवेदन देताना माजी महापौर शिवाजी सुंठकर, संजू इंदर, बबन मालाई, किसन सुंठकर, धाकलू काकतकर, भूवन मालाई, राम दसका, कल्लाप्पा नाईक, जयराम बुदरूम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

तोडगा काढण्याची सूचना

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तलावाचा विकास होत असल्याने महापालिका काहीच करू शकत नाही. असे उत्तर देवून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला. पण सदर तलाव महापालिकेचा असल्याने महापालिका प्रशासनानेच याबाबत आवश्यक कारवाई करावी, अशी सूचना करण्यात आली. यामुळे महापालिकेच्या वतीने शेतकऱयांच्या समस्यांची माहिती स्मार्ट सीटी कार्यालयाला देवून तोडगा काढण्याची सूचना करण्यात येईल, असे आश्वासन अखेर महापालिका आयुक्तांनी दिले.