|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » इंधन खर्चावर नियंत्रणासाठी मनपा वाहनांना जीपीआरएस

इंधन खर्चावर नियंत्रणासाठी मनपा वाहनांना जीपीआरएस 

@ प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिकेच्या महसुल वाढ होत नसल्याने अनेक कंत्राटदाराची बिले थकली आहेत. मनपाची आर्थिक घडी बिघडली असताना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सुचना करण्यात आली होती. तरीदेखील लेझरटेक पार्क, इंदिरा कॅन्टीनची बिले अदा करण्यासाठी दबाव वाढत आहे. मात्र ही बिले अदा करू नये असा आदेश देवून मनपाच्या सर्व वाहनांना जीपीआरएस सुविधा बसविण्याची सुचना लेखा स्थायी समिती अध्यक्षा वैशाली हुलजी यांनी बजावला.

महापालिकेच्या लेखा स्थायी समितीची  बैठक सोमवारी झाली. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली. आवश्यक माहिती वेळेत दिली जात नाही.माहिती देण्यास चालढकल केली जाते. प्रत्येकवेळी सुचना करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत असतात. जर स्थायी समिती अध्यक्षांच्या आदेशाला किमत नसेल तर आम्ही जमिनीवर बसून बैठकीचे कामकाज चालविण्याचा इशारा अध्यक्षा वैशाली हुलजी यांनी दिला. मात्र आवश्यक माहिती देण्यात येईल अशी विनंती शहर अभियंते आर.एस.नायक यांनी अध्यक्षांना केली. त्याचप्रमाणे माहिती देण्याची सुचना अधिकाऱयांना केली.

किल्ला तलावाची देखभाल करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱयांची असतानादेखील येथील विद्युत बिल भरण्याचा भूर्दंड मनपाच्या माथी मारण्यात आला आहे. येथील व्यापारी गाळयाचे भाडे व याठिकाणी व्यवसाय चालविण्यास देण्यात आलेल्या व्यवसायिकांकडून जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षेखाली स्थापन करण्यात आलेल्या तलाव सुधारणा मंडळ घेते. असे असताना बिल मनपाने का भरायचे असा मुद्दा उपस्थित करून लेझरटेकचे विद्युत बिल अदा करू नये असा ठराव करण्यात आला होता. तसेच मनपाच्या खजिन्यात निधी नसल्याने इंदिरा कॅन्टीनचे बिल अदा करू नये असा ठराव लेखा स्थायी समिती बैठकीत करण्यात आला आहे. मात्र बिले अदा करण्यासाठी पुन्हा स्थायी समितीवर दबाव घालण्यात आला आहे. यामुळे हा प्रस्ताव सोमवारच्या बैठकीत फेटाळण्यात आला.

वडगाव धामणे रोडशेजारी 14 व्या वित्त आयोग निधीमधून गटारी बांधण्यात आल्या असून याबाबत बिल अदा करण्यात आले असल्याचे जमा-खर्चाला मंजूरी देताना निदर्शनास आले. यामुळे याबाबत नगरसेवक दिनेश रावळ यांनी याबाबत आक्षेप घेतला. सदर गटारीचे काम व्यवस्थित झाले नाही. ठिकठिकाणी गटारीमध्ये सांडपाणी साचत आहे. या गटारीचे थर्ड पार्टी इन्पेक्शन करण्यात आले का? असा मुद्दा उपस्थित केला. तसेच सदर कामाची पाहणी करण्यात यावी मागणी दिनेश रावळ यांनी केली. यामुळे सदर कामाबाबत संबधित विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून सदर कामाची पाहणी करून काम व्यवस्थित करण्याची सुचना शहर अभियंते आर.एस.नायक यांनी केली.

तसेच यावेळी जमा खर्चाबाबत चर्चा सुरू असताना महापालिकेच्या वाहनांकरीता इंधन खर्चाचा मुद्दा ऐरणीवर आला. हा खर्च जास्त होत असल्याने याबाबतची माहिती नगरसेवक राकेश पलंगे यांनी यापुर्वी मागितली होती. सोमवारीदेखील याबाबत विचारणा केली असता माहिती देण्यास विलंब करण्यात आला. मात्र उशिराने इंधन खर्चाची माहिती देण्यात आली. महसुल उत्पनापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास आले. यामुळे इंधन खर्चावर नियत्रंण घालण्यासाठी प्रत्येक वाहनामध्ये जीपीआरएस सुविधा बसविण्याची सुचना करण्यात आली. याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आदेश देण्यात आला.

यावेळी बैठकीला उपमहापौर मधूश्री पुजारी, मीनाक्षी चिगरे, शांता उप्पार आदीसह मुख्य लेखाधिकारी रामाप्पा हट्टी, एम.डी.दिक्षित, कायदा आधिकारी यु.डी. महांतशेट्टी, सहाय्यक कौन्सिल सेपेटरी एफ.बी. पिरजादे उपस्थित होते.