|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मंजूरीपेक्षा अधिक वीज वापरणाऱयांना हेस्कॉमचा शॉक

मंजूरीपेक्षा अधिक वीज वापरणाऱयांना हेस्कॉमचा शॉक 

बेळगाव / प्रतिनिधी

मंजूरीपेक्षा अधिक वीज वापरली जात असल्याने हेस्कॉमला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मंजूरीपेक्षा अधिक किलोवॅट वीज वापरणाऱया ग्राहकांना हेस्कॉम दंडात्मक कारवाई करणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता नवा शॉक लागणार असल्याने मर्यादित विज वापरावी लागणार आहे.

विजेचा मीटर घेताना गरजेइतकी वीज मंजुर करून घ्यावी लागते. प्रत्येक किलोवॅटनुसार विजेचे दर वेगवेगळे असतात. त्या दरानुसार ग्राहकांकडून बीलाची आकारणी करण्यात येत असते. परंतु मर्यादेपेक्षा अधिक वीज वापरली जात असल्याने हेस्कॉमला मोठय़ा तोटय़ाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी हेस्कॉमच्या व्यवस्थापकांनी अशा ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसे पत्र प्रत्येक सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना पाठविण्यात आले आहे.

मंजूरीपेक्षा अधिक वीज वापरणाऱया ग्राहकांचे मीटर बंद होण्यासाठी सील व्यवस्थीत आहे का? याची पडताळणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे हेस्कॉमचे सर्वच अधिकारी कामाला लागले आहेत. अशा ग्राहकांना आजवर सूचना करण्यात येत होत्या. आता थेट कारवाई करण्यात येत असल्याने नागरिकांना विजेचा मर्यादित वापर करणे गरजेचे आहे.

ए. एम. शिंदे (सहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)

यापूर्वीही हा नियम होता, परंतु याकडे तितकेसे गांभिर्याने पाहण्यात आले नव्हते. परंतु आता याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अधिक वीज वापर करणाऱया ग्राहकाने एकतर विजेचा भार वाढवून घ्यावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.