|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » टेम्पो उलटून 30 महिला जखमी

टेम्पो उलटून 30 महिला जखमी 

मतीवडे रस्त्यावरील घटना : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

वार्ताहर/ कोगनोळी

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो उलटल्याची घटना घडली. या अपघातात 30 महिला जखमी झाल्या आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी 3.30 च्या सुमारास मत्तीवडे रस्त्यावरील ओढय़ानजीक घडला. यामध्ये साताबाई आप्पासो कांबळे (वय 45) यांची प्रकृती गंभीर आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, सुळगाव येथील एससी समाजातील 40 महिला टेम्पो वाहन क्र. (एमएच 09 ए 7589) यातून निपाणी पोलीस स्थानकाला निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या. निवेदन देऊन परत येत असताना मत्तीवडे रस्त्यावरील जाधव मळ्य़ानजीक असणाऱया ओढय़ाजवळ टेम्पो येताच चालक जगदीश रायगोंडा कांबळे (रा. शेंडूर) याचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. यामध्ये 30 महिला जखमी झाल्या असून त्यातील साताबाई यांची प्रकृती गंभीर आहे.

अपघाताचे वृत्त समजताच सुळगाव व मत्तीवडेतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जखमींना 108 रुग्णवाहिकेतून कागलच्या ग्रामीण रुग्णालयात येण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून सर्व रुग्णांना उपचारासाठी कोल्हापुरला पाठविण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.