|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्मशानभूमीसाठी कावळेवाडी ग्रामस्थांचा एल्गार

स्मशानभूमीसाठी कावळेवाडी ग्रामस्थांचा एल्गार 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

प्रतिनिधी / बेळगाव

गेल्या 100 वर्षांपासून स्मशानभूमी म्हणून आम्ही त्या जमिनीचा वापर करत असताना तसेच ती जमीन स्मशानभूमी म्हणून नोंद असताना सात-बारा उताऱयामध्ये फेरफार करण्यात आली आहे. यामुळे कावळेवाडी ग्रामस्थांना स्मशानभूमीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेंव्हा पूर्वीप्रमाणेच त्या जागेमध्ये आम्हाला अंत्यविधी करण्यासाठी मुभा द्यावी तसेच अडवणूक करणाऱयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी कावळेवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढुन निवेदन दिले.

कावळेवाडी येथील सर्व्हे क्रमांक 668 मध्ये एकर 20 गुंठे जमीन स्मशानभूमी म्हणून नोंद होती. एकूण 13 एकर ही जमीन आहे. त्यामध्ये ही नोंद आहे. असे असताना चार दिवसांपूर्वी प्रांताधिकारी कार्यालयातून त्या उताऱयामध्ये फेरफार करण्यात आली. याचबरोबर स्मशानभूमीचा रस्ता अडविण्यात आला. तसेच अंत्यविधी करण्यास विरोध करण्यात आला. यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

कावळेवाडी येथील वैजु विठोबा मोरे, ओमाणी गावडू मोरे, मनोहर ओमाणी मोरे, जोतिबा ओमाणी मोरे, कृष्णा यल्लाप्पा मोरे यांनी हा विरोध केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही त्या ठिकाणी अंत्यविधी करत आहे. याचबरोबर स्मशानभूमी म्हणून उताऱयामध्ये नोंदही आहे. असे असताना त्यांनी संपूर्ण गावाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. तेंव्हा जिल्हाधिकाऱयांनी या प्रकाराकडे जातीने लक्ष देवून आम्हाला त्या जागेत अंत्यविधी करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून उताऱयामध्ये स्मशानभूमी म्हणून नोंद असताना अचानकपणे ती का बदलण्यात आली? याचबरोबर फेरफार करणाऱयांवर आणि संबंधितांच चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे स्मशानभूमीसाठी प्रत्येक गावाला जागा उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासाठी पूर्वीपासूनच ती जागा राखीव ठेवण्यात आली होती. असे असताना अचानकपणे रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेंव्हा याची चौकशी करुन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी जोतिबा बाळु मोरे, कल्लाप्पा यळ्ळूरकर, रघुनाथ मोरे, मोनाप्पा यळ्ळूरकर, ऍड. नामदेव मोरे, जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे, देवेंद्र गावडे, यल्लाप्पा मोरे, मिनाजी ओऊळकर यांच्यासह महिला व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.