खासदार राजू शेट्टी महाआघाडीत जाणार नाही, लोकसभेच्या 9 जागा लढवण्याची तयारी

ऑनलाईन टीम / मुंबई :
खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या 4-5 दिवसात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे.
महाआघाडीत न जाण्याच्या भूमिकेनंतर राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नऊ जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी देखील केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला सहा जागांचा प्रस्ताव स्वाभिमानीने दिला होता, त्यातील तीन जागांवर शेट्टी ठाम होते. त्यामध्ये हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. राजू शेट्टी यांनी बुलढाण्याची जागा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी तर वर्ध्याची जागा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी मागितली होती. मात्र याबाबत ठोस काही चर्चा झाली नसल्याने राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो’ची तयारी केली आहे. लोकसभेसाठी हातकणंगले, बुलढाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली, धुळे, शिर्डी, लातूर या नऊ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.