|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » Top News » पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला, चार सदस्य लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे

पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला, चार सदस्य लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे 

ऑनलाईन टीम /  मुंबई : 

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणी निवडणूक लढवायची, यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. एकीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातील चौघा जणांची प्रतिष्ठा यंदा पणाला लागण्याची शक्यता आहे.

बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांची कन्या म्हणजेच बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शिरुर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी करत आहेत, तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून नशीब आजमावण्याची शक्यता आहे. एका  वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.  सुप्रिया सुळे या गेल्या वेळी लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरणाऱ्या पवार कुटुंबातील एकमेव सदस्य होत्या. पवार कुटुंबीयांनी निवडणूक लढवली, तर फक्त त्या-त्या मतदारसंघातीलच नाही, तर राष्ट्रवादीच्या इतर जागा जिंकण्याची शक्यताही वाढेल, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अंदाज आहे. तसेच राष्ट्रीय राजकारणातही राष्ट्रवादीचा वरचष्मा राहील, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. शरद पवारांनी 2009 साली सोलापुरातील माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्याआधी, जवळपास दोन दशके  राखलेली बारामतीची जागा त्यांनी लेकीसाठी सोडली होती. सुप्रिया सुळे सलग दुसऱ्यांदा बारामतीतून खासदार आहेत. त्यामुळे पवारांनी पुणे किंवा माढ्यातून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. मात्र पुण्यातील जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु आहे.