|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » अखिलेश यादव यांना लखनऊ विमानतळावर रोखले

अखिलेश यादव यांना लखनऊ विमानतळावर रोखले 

ऑनलाईन टीम / अलाहबाद :

अलाहबाद विद्यापीठाच्या छात्रसंघाच्या शपथविधी समारंभासाठी जाणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सुरक्षेची कारणे देऊन लखनऊ विमानतळावरच रोखण्यात आले. यामुळे भडकलेल्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लखनऊ विमानतळाबाहेर गोंधळ घातला तर प्रयागराज विमानतळासमोर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी योगी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. समाजवादी विचार तरुणांमध्ये रुजू नये म्हणून सरकारने हे पाऊल उचलले असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

अलाहबाद विद्यापीठात नुकत्याच छात्रसंघाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाच्या युवा मोर्चाचे उमेदवार बहुमताने विजयी झाले तर अभाविपचे उमेदवार पराभूत झाले. विजयी उमेदवारांच्या शपथविधी समारंभासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अखिलेश यादव हजर राहणार होते. त्यासाठी त्यांनी रीतसर परवानगीही घेतली होती. पण जेव्हा ते लखनऊ विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना विमानात चढूच दिले नाही. प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू असल्यामुळे सुरक्षेची कारणे देत त्यांना लखनऊतच रोखण्यात आले. दरम्यान यासंदर्भातील लेखी ऑर्डरसाठी विचारणा केली असता पोलिसांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याची माहिती अखिलेश यादव यांनी दिली आहे. यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. अखिलेश यादव यांना रोखल्यामुळे लखनऊ विमानतळाबाहेर सपाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. प्रयागराज विमानतळाबाहेरही घोषणाबाजी केली आहे.