|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » कोर्टाबाहेर अंबानींवर टीका अन् कोर्टात त्यांच्यासाठी युक्तीवाद ; सिब्बल नेटकऱयांच्या रडारवर

कोर्टाबाहेर अंबानींवर टीका अन् कोर्टात त्यांच्यासाठी युक्तीवाद ; सिब्बल नेटकऱयांच्या रडारवर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसचे ज्येष्ठ  नेते आणि प्रख्यात वकील कपिल सिब्बल यांची आज चांगलीच तारांबळ उडाली आहे. एका बाजूला पेशा सांभाळायचा आणि दुसऱया बाजूला पक्षाचा वरिष्ठ नेते म्हणून मिळालेली जबाबदारीही पार पाडायची, अशी तारेवरची कसरत कपिल सिब्बल यांना करावी लागली.

मात्र ज्या व्यक्तीचा न्यायालयात बचाव केला, त्याच व्यक्तीवर न्यायालयाच्या बाहेर येताच टीका केली, यावरुन सिब्बल सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. रिलायन्स विरुद्ध एरिक्सन प्रकरणात आज कपिल सिब्बल यांनी रिलायन्सची म्हणजेच अनिल अंबानींची बाजू मांडली. रिलायन्सने (आर कॉम) एरिक्सन इंडियाचे पैसे थकवले आहेत. ते पैसे मिळावेत यासाठी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यातच रिलायन्स कम्युनिकेशनने दिवाळखोरी जाहीर केली. आर कॉमने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा दावा एरिक्सनने केला. या प्रकरणात आज रिलायन्सचे अनिल अंबानी न्यायालयात हजर झाले.

त्यावेळी कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयात जाऊन अंबानींच्या वतीने युक्तीवाद करण्याआधी सिब्बल यांनी त्यांच्यावरच जोरदार टीका केली. मोदी सरकारने अनिल अंबानींना राफेलचे कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी केला. ‘एअरबस, प्रेंच सरकार, अनिल अंबानी या सर्वांना पंतप्रधान सामंजस्य करार करणार असल्याची माहिती होती. मोदी 9 ते 11 एप्रिल 2015 दरम्यान फ्रान्समधील असतील. त्याचवेळी करारावर स्वाक्षऱया होतील, याची कल्पना अंबानींना होती,’ असे सिब्बल यांनी ट्विटमध्ये म्हटले. संरक्षण करारासारखी गोपनीय बाब अंबानींना कशी काय समजली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अनिल अंबानींना राफेल करारावरुन लक्ष्य करणारे सिब्बल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले. एका बाजूला अंबानींवर टीका करता, कोर्टाबाहेर त्यांच्यावर तोंडसुख घेता आणि कोर्टात जाऊन त्यांच्याच बाजूने युक्तीवाद करता? हा दुटप्पीपणा नाही का? असा प्रश्न अनेकांनी सिब्बल यांना विचारला. तर काहींनी सिब्बल दोन्हीकडून फायद्यात राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले. नेते म्हणून अंबानींवर टीका करुन सिब्बल पक्षासमोर चमकतात. तर दुसरीकडे वकील म्हणून अंबानींची बाजू मांडून पैसाही कमावतात, असे अनेकांनी ट्विटमधून म्हटले आहे.