|Thursday, June 20, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑल इंग्लंड बॅडमिंटन : सायना, सिंधू, श्रीकांतला कठीण ड्रॉ

ऑल इंग्लंड बॅडमिंटन : सायना, सिंधू, श्रीकांतला कठीण ड्रॉ 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

यंदा 6 मार्चपासून बर्मिंगहममध्ये खेळवल्या जाणाऱया ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेसाठी सायना नेहवाल, पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत या तिघाही दिग्गज भारतीय खेळाडूंना कठीण ड्रॉ मिळाला आहे. गतवर्षी उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणाऱया पीव्ही सिंधूची सलामीची लढत दक्षिण कोरियाच्या सूंग जी हय़ूनविरुद्ध होईल तर सायना नेहवालचा सामना स्कॉटलंडच्या किर्स्टी गिल्मूरविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत तब्बल 18 वर्षांपासून एकही जेतेपद मिळवता आलेले नाही. तो दुष्काळ संपुष्टात काढण्याचे संघासमोर यंदाही आव्हान असेल.

महिला एकेरीतील पाचवी मानांकित पीव्ही सिंधू ही दक्षिण कोरियाच्या सूंग जी हय़ूनविरुद्ध आपल्या मोहिमेला प्रारंभ करेल. मंगळवारपासून आयोजित राष्ट्रीय चॅम्पियनशिप खेळल्यानंतर सिंधू बर्मिंगहमला रवाना होणार आहे. गतवर्षी इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतील तिसऱया फेरीत तिला चीनच्या ली क्झुरुईविरुद्ध अपयशाचा सामना करावा लागला होता.

गतवर्षी हाँगकाँग ओपनमध्ये सिंधू-हय़ून आमनेसामने भिडले, त्यावेळी सिंधूला केवळ दोनच गेम्समध्ये पराभव स्वीकारावा लागला. सलामीचे अडथळे यशस्वीरित्या पार केले तर सिंधूसमोर उपांत्यपूर्व फेरीत तिसऱया मानांकित चेन युफेईला सामोरे जावे लागेल, असे एकंदरीत चित्र आहे. सायनाची उपांत्यपूर्व फेरी तई त्झू यिंगविरुद्ध होऊ शकते.

दरम्यान, या स्पर्धेतील आठवी मानांकित सायना नेहवाल स्कॉटलंडच्या किर्स्टी गिल्मरविरुद्ध आपल्या मोहिमेला प्रारंभ करणार असून या हंगामातील जोरदार प्रारंभाचा तिला लाभ होऊ शकतो. यापूर्वी मलेशियात उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर इंडोनेशियात तिने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. तई त्झू यिंग ही सायनाच्या गटातच असून उपांत्यपूर्व फेरीत या दोघी आमनेसामने भिडू शकतात. तई त्झू यिंग ही विद्यमान जेती, तसेच विद्यमान अव्वलमानांकितही आहे.

पुरुषांच्या गटात किदाम्बी श्रीकांतलाही कठीण ड्रॉ मिळाला. सातव्या मानांकित श्रीकांतची पहिली लढत फ्रान्सच्या ब्राईस लेव्हेर्डेझविरुद्ध होईल. त्यानंतर दुसऱया फेरीत जोनातन ख्रिस्ती तर शेवटच्या आठमध्ये पोहोचल्यास तेथे अव्वलमानांकित केन्टो मोमोटाविरुद्ध त्याचा कस लागू शकतो. भारताचा राष्ट्रीय चॅम्पियन एचएस प्रणॉय व माजी सिंगापूर ओपन चॅम्पियन साई प्रणित पहिल्याच फेरीत आमनेसामने भिडत आहेत. यांच्यातील विजेत्याची लढत एन्ग का लाँग व आठवा मानांकित अँथोनी सिनिसुका गिन्टिंग यांच्यातील जेत्याशी होईल. समीर वर्मालाही कठीण ड्रॉ मिळाला असून पहिल्याच फेरीत त्याच्यासमोर डेन्मार्कच्या सहाव्या मानांकित व्हिक्टर ऍक्झेल्सनचे आव्हान असेल.

महिला एकेरीतील विद्यमान जेती कॅरोलिना मारिन व मलेशियन महान खेळाडू ली चोंग वेई यंदा या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. स्पेनची मारिन सध्या दुखापतीतून सावरत आहे तर चोंग वेई देखील नाकाच्या कर्करोगातून पूर्ण सावरायचा आहे. पुरुषांच्या दुहेरीत मनू अत्री-सुमीत रेड्डी तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी यांच्यावर भारताची भिस्त असेल. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी यांची सलामीची लढत हाँगकाँगच्या चँग ताक चिंग व एन्ग विंग यंगविरुद्ध होणार आहे.