|Thursday, June 20, 2019
You are here: Home » क्रिडा » गॅब्रियलला पंचांकडून समज

गॅब्रियलला पंचांकडून समज 

वृत्तसंस्था/ ग्रॉस आयलेट, सेंट लुसिया

विंडीजचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रियलला तिसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी मैदानी पंचांनी ताकीद दिली. इंग्लंडचा कर्णधार रूटशी झालेल्या बाचाबाचीवेळी त्याने असभ्य भाषेचा वापर केल्यामुळे पंचांनी त्याला समज दिल्याचे वृत्त ब्रिटिश मीडियाने दिले आहे.

या चकमकीवेळी गॅब्रियलने काय म्हटले याचे स्टंपमधील माईकमधून रेकॉर्ड झालेले नाही. मात्र ‘गे असणे काहीही गैर नाही,’ असे रूटने म्हटल्याचे स्टम्प माईकमधून स्पष्टपणे ऐकू येते. यानंतर मैदानी पंच रॉड टकर व कुमार धर्मसेना यांनी गॅब्रियलला समज दिल्याचे दिसून आले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा गॅब्रियलने नेमके काय म्हटले होते, हे सांगण्यास रूटने नकार देत वाद वाढविण्याचे टाळले. मैदानातील घटना मैदानातच राहू द्या, एवढेच तो म्हणाला. ‘कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठी काही ना काही प्रयत्न करीत असतो. गॅब्रियलनेही तेच केले. तो भावनाप्रधान असला तरी एक चांगला खेळाडू आहे. आम्हा दोघांतील जुगलबंदी चांगली रंगली होती,’ असे सांगत रूटने त्यावर पडदा टाकला. मैदानात काय घडले याची मलाही माहिती नसल्याचे विंडीजचे प्रशिक्षक रिचर्ड पायबस म्हणाले.