|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडला 448 धावांची आघाडी

इंग्लंडला 448 धावांची आघाडी 

कर्णधार रूटचे नाबाद शतक, डेन्ली, बटलर यांची अर्धशतके

वृत्तसंस्था/ ग्रॉस आयलेट, सेंट लुसिया

जो रूटने नोंदवलेल्या 16 व्या कसोटीच्या बळावर इंग्लंडने मोठी आघाडी घेत विंडीजविरुद्धच्या तिसऱया कसोटीवर मजबूत पकड बसविली आहे. तिसऱया दिवशीअखेर इंग्लंडने 4 बाद 325 धावा जमविल्या असून त्यांनी एकूण 448 धावांची आघाडी मिळविली होती.

बिनबाद 19 या धावसंख्येवरून इंग्लंडने तिसऱया दिवसाच्या खेळास प्रारंभ केला. बर्न्स लवकर बाद झाला तरी रूटने प्रथम जेनिंग्स व नंतर डेन्ली आणि बटलर यांच्यासमवेत उपयुक्त भागीदारी करीत संघाला मजबूत स्थिती प्राप्त करून दिली. रूट दिवसअखेर 111 धावांवर खेळत असून त्याने 209 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार मारले होते. या सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असून इंग्लंडला विजयाची चांगली संधी आहे. पहिल्या दोन कसोटीत पराभव स्वीकारल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाज व फलंदाजांनी या कसोटीत शानदार प्रदर्शन घडविले. विंडीजचा कीमो पॉल जखमी झाल्याने तिसऱया दिवशी तो मैदानात उतरू शकला नव्हता. त्यामुळे विंडीजची गोलंदाजी आणखी दुबळी झाली होती. याचा पुरेपूर लाभ इंग्लंडच्या फलंदाजांनी घेतला.

एखाद्या कसोटी मालिकेत एकतरी अर्धशतक रूटने नोंदवलेले आहे. या मालिकेतील याआधीच्या पाच डावात त्याने केवळ 55 धावा जमविल्या होत्या. या अपयशाची भरपाई त्याने शेवटच्या डावात केली. त्याने डेन्लीसमवेत तिसऱया गडय़ासाठी 74, बटलरसमवेत चौथ्या गडय़ासाठी 107 आणि बेन स्टोक्ससमवेत पाचव्या गडय़साठी अभेद्य 71 धावांच्या सलग तीन भागीदारी केल्या. डेन्लीने 99 चेंडूत 69, बटलरने 115 चेंडूत 56 धावा केल्या तर स्टोक्स 29 धावांवर रूटला साथ देत आहे. त्याने सावध व संयमी खेळावर अधिक भर दिला होता तर त्याच्या जोडीदारांनी आक्रमण करण्याचे धोरण ठेवले होते. पॉल नसल्याने रॉक व गॅब्रियल यांच्यावर गोलंदाजीचा अधिक भार पडला होता.

सकाळी खेळास प्रारंभ झाल्यावर रॉरी बर्न्स पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. पॉलने हे यश मिळविले. मात्र निलंबित कर्णधार होल्डरच्या जागी घेतलेल्या पॉलने थोडय़ाच स्ट्रेचरचा आधार घेत मैदान सोडले. सीमारेषेवर चेंडू अडविण्याचा प्रयत्न करताना त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. हेतमेयरने नंतर डेन्लीचा सोपा झेल सोडला. जेनिंग्स जोसेफचा चेंडू वळविणचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या कडेला लागून उडाला आणि त्याच्या शरीराचा स्पर्श करीत यष्टय़ांवर जाऊन पडला. त्याने 23 धावा काढल्या. गॅब्रियलने नंतर डेन्ली बाद केल्यानंतर बटलरला रॉकने त्रिफळाचीत केले. त्याचा हा मालिकेतील 18 वा बळी होता. स्टोक्सने नंतर दिवसअखेरपर्यंत कर्णधाराला साथ देत आणखी पडझड होऊ दिली नाही. चौथ्या दिवशी पाचशेची आघाडी घेऊन इंग्लंड डाव घोषित करयणची शक्यता आहे.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 101.5 षटकांत सर्व बाद 277, विंडीज प.डाव 47.2 षटकांत सर्व बाद 154,

इंग्लंड दु.डाव 100 षटकांत 4 बाद 325 : बर्न्स 10, जेनिंग्स 23 (99 चेंडूत 2 चौकार), डेन्ली 69 (99 चेंडूत 11 चौकार), रूट खेळत आहे 111 (209 चेंडूत 9 चौकार), बटलर 56 (115 चेंडूत 5 चौकार), स्टोक्स खेळत आहे 29 (59 चेंडूत 2 चौकार), अवांतर 27. गोलंदाजी : रॉक 1-31, गॅब्रियल 1-87, पॉल 1-11, जोसेफ 1-63, चेस 0-92, बेथवेट 0-24.