|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » विहारीच्या शतकानंतरही शेष भारत सर्वबाद 330

विहारीच्या शतकानंतरही शेष भारत सर्वबाद 330 

 अवघ्या 5 धावांनी शतक हुकलेल्या मायंक अगरवालची फटकेबाजी

नागपूर / वृत्तसंस्था

हनुमा विहारीचे (11 चौकार, 2 षटकारांसह 114) तडफदार शतक व मायंक अगरवालच्या (10 चौकार, 3 षटकारांसह 95) तुफानी फटकेबाजीनंतरही येथे इराणी चषक स्पर्धेतील पहिल्या दिवशी विदर्भविरुद्ध शेष भारत संघाचा पहिला डाव 330 धावांमध्येच आटोपला. एकवेळ 1 बाद 171 अशा भक्कम स्थितीतून शेष भारतचे उर्वरित 9 फलंदाज केवळ 159 धावा जोडू शकले आणि यामुळे त्यांना मोठय़ा धावसंख्येची आस सोडून द्यावी लागली. विदर्भच्या फिरकीपटूंचा प्रभावी मारा येथे विशेष लक्षवेधी ठरला.

डावातील 39 व्या षटकात अगरवाल बाद झाल्यानंतर शेष भारत संघाच्या डावाला सुरुंग लागत गेले. पायचीतच्या एका जोरदार अपिलातून सुदैवानेच बचावल्यानंतर काही वेळातच त्याने यश ठाकुरच्या गोलंदाजीवर कव्हरकडे झेल दिला. यश ठाकुर या लढतीत उमेश यादवच्या जागी खेळत आहे. यश ठाकुरसाठी हे दिवसातील एकमेव यश ठरले.

शेष भारत संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे 38 चेंडूत केवळ 13 धावा जमवू शकला. श्रेयस अय्यर (23 चेंडूत 19) देखील फार काळ टिकू शकला नाही. तो अक्षय कर्णेवरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. चहापानाच्या उंबरठय़ावरच इशान किशन (2) अक्षय वखरेला स्मॅश करण्याच्या प्रयत्नात गुरबानीकडे झेल देत परतला. पहिल्या सत्रात शेष भारत संघाने 1 बाद 142 अशी जोरदार सुरुवात केली होती. त्यानंतर दुसऱया सत्रात मात्र त्यांना 92 धावांमध्येच 4 फलंदाज गमवावे लागले.

तिसऱया सत्रात कृष्णप्पा गौतमच्या खराब फटक्याने शेष भारतच्या डावाची सुरुवात झाली. गौतम मिडविकेटवरील गुरबानीकडे झेल देत वखरेचे आणखी एक सावज ठरला. आदित्य सरवटेने डावखुऱया फिरकीच्या बळावर धर्मेंद्रसिंह जडेजाची खेळी संपुष्टात आणली. 7 बाद 258 अशा स्थितीत असताना शेष भारतचा संघ 300 धावाच्या आतच गुंडाळला जाईल, अशी चिन्हे होती. पण, शतकवीर विहारीने राहुल चहरच्या साथीने आठव्या गडय़ासाठी 49 धावा जोडल्या आणि यामुळे त्यांना त्रिशतकी मजल गाठता आली.

अगरवाल-विहारीची आक्रमक सुरुवात

तत्पूर्वी, दिवसाच्या प्रारंभी अगरवालने रजनीश गुरबानीच्या पहिल्याच षटकात दोन सणसणीत चौकार वसूल करत संघाला जोरदार सुरुवात करुन दिली. नंतर त्याने सरवटेलाही काही उत्तम फटके लगावले. यष्टीरक्षक अक्षय वाडकर एकदा कठीण झेल टिपू न शकल्याने ही बाबही अगरवालच्या पथ्यावर पडली. विहारीला देखील सुदैवाची बरीच साथ लाभली. यश ठाकुरच्या गोलंदाजीवर विहारीविरुद्ध यष्टीमागे झेलबादचे जोरदार अपील झाले. पण, मैदानी पंचांनी ते फेटाळून लावले आणि डीआरएस नसल्याने विदर्भकडे काही पर्यायच नव्हता. टीव्ही रिप्लेत चेंडूने बॅटची किंचीत कड घेतल्याचे स्पष्ट झाल्याने विदर्भची आणखी निराशा झाली.

अनमोलप्रीत सिंग 15 धावांवर बाद झाल्यानंतर मायंक व विहारी यांनी षटकामागे पाचच्या सरासरीने फटकेबाजी केली. विहारीने उपाहारानंतर लागलीच अर्धशतक साजरे केले. त्याने सरवटेला एकाच षटकात दोन चौकार व एका षटकारासाठी भिरकावून दिले. 77 व्या षटकात त्याने स्ट्रेट ड्राईव्हचा उत्तम फटका लगावत 16 वे प्रथमश्रेणी शतक झळकावले. तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरलेला विहारी आठव्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला. त्याने सरवटेच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लीपमधील फैज फजलकडे झेल दिला.

वखरेची गोलंदाजी किफायतशीर

विदर्भतर्फे वखरेने 62 धावात 3 बळी, अशी सर्वात किफायतशीर गोलंदाजी साकारली. प्रारंभी बराच मार सोसणाऱया सरवटेने देखील 3 बळी घेतले. खेळपट्टी कडक सुर्यप्रकाशात सुलाखून निघाल्यानंतर सरवटेचे चेंडू वळू लागले. पुढे त्याने जडेजा व विहारी यांना लागोपाठ बाद केले. सातत्याने यष्टीवरच मारा करणाऱया गुरबानीला अनमोलप्रीत व चहरचे बळी मिळाले. त्याने 58 धावात 2 बळी, असे पृथक्करण नोंदवले. डावखुरा फिरकीपटू अक्षय कर्णेवर व यश ठाकुर यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला.

धावफलक

शेष भारत पहिला डाव : मायंक अगरवाल झे. गुरबानी, गो. ठाकुर 95 (134 चेंडूत 10 चौकार, 3 षटकार), अनमोलप्रीत सिंग त्रि. गो. गुरबानी 15 (21 चेंडूत 3 चौकार), हनुमा विहारी झे. फजल, गो. सरवटे 114 (211 चेंडूत 11 चौकार, 2 षटकार), अजिंक्य रहाणे झे. संजय, गो. सरवटे 13 (38 चेंडू), श्रेयस अय्यर पायचीत गो. कर्णेवर 19 (23 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), इशान किशन झे. गुरबानी, गो. वखरे 2 (9 चेंडू), कृष्णप्पा गौतम झे. गुरबानी, गो. वखरे 7 (7 चेंडू), धर्मेंद्रसिंह जडेजा त्रि. गो. सरवटे 6 (22 चेंडूत 1 चौकार), राहुल चहर त्रि. गो. गुरबानी 22 (45 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), अंकित रजपूत त्रि. गो. वखरे 25 (21 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), तनवीर-उल-हक नाबाद 0 (9 चेंडू). अवांतर 12. एकूण 89.4 षटकात सर्वबाद 330.

गडी बाद होण्याचा क्रम

1-46 (अनमोलप्रीत, 8.5), 2-171 (मायंक, 38.3), 3-186 (रहाणे, 49.6), 4-231 (58.5), 5-234 (इशान, 61.3), 6-246 (कृष्णप्पा गौतम, 63.5), 7-258 (जडेजा, 70.2), 8-305 (विहारी, 84.2), 9-305 (चहर, 85.2), 10-330 (रजपूत, 89.4).

गोलंदाजी

गुरबानी 15-2-58-2, यश ठाकुर 17-3-52-1, आदित्य सरवटे 28-5-99-3, अक्षय कर्णेवर 15-3-50-1, अक्षय वखरे 14.4-0-62-3. 

वासिम जाफर दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर

आज या सामन्याच्या दुसऱया दिवशी विदर्भचे फलंदाज आक्रमक प्रारंभ करण्यासाठी उत्सुक असतील. पण, येथे त्यांना अनुभवी वासिम जाफरशिवाय खेळावे लागणार आहे. या सामन्यापूर्वी तंदुरुस्ती चाचणी पार करता न आल्याने जाफरला बाहेर व्हावे लागले. जाफरला गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. शेष भारत संघाची मुख्य भिस्त आता फिरकीपटू चहर व धर्मेंद्रसिंह जडेजा यांच्यावरच आहे. यंदाच्या रणजी हंगामात केवळ फिरकीपटूंनीच 99 पैकी 67 बळी घेतले, हे लक्षवेधी आहे.

1 बाद 171 वरुन शेष भारत संघाची जोरदार पडझड

या सामन्यात शेष भारत संघाने एकवेळ 1 बाद 171 अशी जोरदार, भरभक्कम सुरुवात केली होती. पण, त्यानंतर त्यांचा डाव ठरावीक अंतराने कोसळत राहिला आणि त्यांचे उर्वरित 9 फलंदाज केवळ 159 धावांची भर घालू शकले. या पडझडीमुळे शेष भारतला उत्तम प्रारंभानंतरही सर्वबाद 330 धावांवर समाधान मानावे लागले.