|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू बँक्स कालवश

इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू बँक्स कालवश 

वृत्तसंस्था / लंडन

1966 साली फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया इंग्लंड संघाचे गोलरक्षक गॉर्डन बँक्स यांचे मंगळवारी येथे वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

1963 ते 1972 या कालावधीत बँक्स यांनी आपल्या फुटबॉल कारकीर्दीत 73 सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्त्व केले. इंग्लीश प्रिमियरलीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया स्टोक सिटी संघाकडून बँक्स यांनी सुमारे 200 सामने खेळले आहेत. मोटार दुर्घटनेत त्यांना आपला एक डोळा गमवावा लागल्याने फुटबॉल कारकीर्दीला पूर्णविराम द्यावा लागला. जागतिक फुटबॉल क्षेत्रामध्ये बँक्स हे सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून ओळखले जात. 1970 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझिलचे फुटबॉल सम्राट पेले यांनी मारलेला फटका बँक्स यांनी थोपविला होता. 1966 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात बँक्स यांनी इंग्लंडचे प्रतिनिधीत्त्व केले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडने तत्कालिन पश्चिम जर्मनी संघाचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव करून विजेतेपद मिळविले होते. विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासामध्ये इंग्लंडने 1966 मध्ये केवळ एकदाच आतापर्यंत अजिंक्यपद मिळविले आहे. 1973 साली बँक्स यांनी फुटबॉल क्षेत्रातून  निवृत्ती पत्करली. 1963 साली बँक्स यांनी इंग्लंड संघात पहिल्यांदा प्रवेश केला. त्यानंतर 3 वर्षांनी त्यांनी आपल्या संघाला विश्वकरंडक मिळवून दिला होता. जर्मन फुटबॉल संघटनेने बँक्स यांच्या निधानानंतर दुखवटा व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.