|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विरोधकांकडून महापौरांचा निषेध

विरोधकांकडून महापौरांचा निषेध 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजनेच्या श्वेतपत्रिकावरुन महापालिकेच्या सभेत प्रचंड गदारोळ झाला. सत्ताधारी, विरोधक आमने-सामने आले. सभेत मुस्कटदाबी होत असल्यावरुन तसेच घरफाळय़ाचा विषय ऐनवेळी आणल्यावरुन विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने महापौर सरिता मोरे यांच्यासह प्रशासनाचा निषेध करुन सभात्याग केला. थेटपाईपलाईनची योजनेला जाणूनबुजून परवानगी नाकारत असल्यावरुन तसेच महापौरांचा निषेध केल्यावरुन सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी राज्यशासनाचा तसेच भाजप-ताराराणी आघाडीचा निषेध करत सभा तहकूब केली. यानंतर दोन्ही आघाडीकडून पत्रकार परिषद घेवून एकमेंकाच्या नेत्यांविरोधात चिखलफेक केली.

 या वादामध्ये प्रशासनाचे दरवाढीचे प्रस्तावावर निर्णय होवू शकला नाही. यामध्ये घरफाळा, पाणीपट्टीच्या महत्वाच्या ठरावांचा समावेश होता. विरोधी आघाडीने थेटपाईपलाईन योजनेमध्ये 100 कोटींचा ढपला पाडला असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सत्ताधाऱयांचे ठेकेदाराला दबाव टाकून मलई खाण्यासाठी सुकाणू समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. तसेच लवकरच यासाठी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने  भाजप सरकारमुळेच परवानगी रखडल्या असून काँगेस-राष्ठ्रवादीला श्रेय मिळू नये म्हणून योजनेत अडकाटी घातली जात असल्याचा आरोप केला आहे. नगरसेवकांकडूनच सभागृहात महापौरांचा निषेध करण्याची बहुदा पहिलीच वेळ आहे.