|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आंदोलनाच्या इशाऱयानंतर रस्त्याचे काम सुरू

आंदोलनाच्या इशाऱयानंतर रस्त्याचे काम सुरू 

प्रतिनिधी/ कुरूंदवाड

शिरोळ तालुक्याच्या तिर्थक्षेत्र नृसिंहवाडीहून औरवाड, गणेशवाडी मार्गे कर्नाटक राज्याला जोडणारा राज्यमार्ग  क्रं. 23 अत्यंत खराब झालेला रस्ता तातडीने दुरूस्त करावा, अन्यथा राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवार 13रोजी नृसिंहवाडी-औरवाड फाटय़ावर आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन नुकतेच राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, जिल्हा परिषद सदस्या परविन पटेल, पंचायत समिती सदस्य मल्लाप्पा चौगुले, रूपाली मगदूम, मुनिर शेख, दादेपाशा पटेल, आदीनाथ आरबाळे यांनी तहसीलदार शिरोळ, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर व कोल्हापूर तसेच शिरोळ व कुरूंदवाड पोलीस स्टेशनला दिले होते.

या आंदोलनाचा धसका घेत बांधकाम विभागाने हालचाली करत या रस्त्याचे काम तातडीने सुरू करत असल्याबाबतचे लेखी पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरोळ तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर यांना दिले. राष्ट्रवादीचे बुधवारी होणारे आंदोलन स्थगित करून सहकार्य करावे, असे बांधकाम विभागाने या पत्रात नमूद केले आहे. त्याचाच भाग म्हणून आज औरवाडपासून या रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात झाली. या ठिकाणी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रत्यक्ष भेटी देवून हा रस्ता नदीपलीकडील सात गावच्या जनतेसाठी व या मार्गावरून प्रवास करणाऱया सर्वांसाठी अतिशय महत्वाच असल्याने याची दुरूस्ती चांगली व मजबूत व्हावी, अशा सूचना संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला दिल्या.

यावेळी दादेपाशा पटेल, आदिनाथ आरबाळे, आनंदा कुम्मे, संजय नांदणे, ऋषीराज शिंदे आदी उपस्थित होते. रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली असल्यामुळे बुधवार 13 रोजीचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.