|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सर्फनाला प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा

सर्फनाला प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा 

प्रतिनिधी/ आजरा

आजरा तालुक्याच्या पश्चिम विभागातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सर्फनाला प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवार दि. 12 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व प्रकल्पाच्या कामाबाबत सकारात्मक चर्चा झाली.

तालुक्याच्या पश्चिम विभागात होत असलेला हा प्रकल्प तालुक्याला वरदान ठरणाऱया या प्रकल्पाचे 70 टक्केपेक्षा अधिक काम झाले आहे. पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी प्रकल्पाचे काम रखडले होते. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून हा प्रकल्प होणे अतिशय महत्वाचे असल्यामुळे आजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी यांनी तालुक्यातील सर्वच प्रकल्पांबरोबर सर्फनाला प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांच्या माध्यमातून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.

लाभ क्षेत्रातील जमीनीचा आढावा घेण्यात आला. सर्फनाल्यातील धरणग्रस्तांना 110 हेक्टर जमीन देय आहे. लाभ क्षेत्रात 70 हेक्टर जमीन उपलब्ध असून तर 54 हेक्टर जमीन गायरान क्षेत्रात उपलब्ध असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांनी सांगितले. याशिवाय पारपोली गावातील घरांच्या मूल्यांकनाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. लाभक्षेत्रात जमीन मुबलक प्रमाणात जमीन उपलब्ध असल्याने धरणग्रस्त शेतकऱयांना जमीन पसंतीला संधी आहे. यामुळे याठिकाणी विशेष आर्थिक पॅकेज देण्याचा प्रश्न येत नसल्याची चर्चाही यावेळी करण्यात आली.

धरणग्रस्तांनीही प्रशासनाने दिलेल्या माहितीवर सांगोपांग चर्चा केली. धरणाचे काम सुरू करण्याबाबत सर्फनाल्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांची चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे धरणग्रस्तांनी या बैठकीवेळी सांगितले. याशिवाय धरणग्रस्तांच्या नोकऱयांबाबत चर्चा करताना जिल्हय़ातील सर्व सहकारी संस्थांमध्ये पुनर्वसन कायद्याप्रमाणे 5 टक्के जागा धरणग्रस्तांमधून भराव्यात असा मुद्दा धरणग्रस्तांनी लावून धरला. याबाबत प्रशासनपातळीवर सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती काटकर यांनी दिली. याला आजरा तालुक्यातील नेते मंडळींनीही हिरवा कंदील दिला असल्याचे धरणग्रस्तांनी सांगितले.

या बैठकीला आजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी, संचालक विलास नाईक, दशरथ अमृते, धरणग्रस्तांच्यावतीने सुरेश मिटके, कॉ. संजय तर्डेकर यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते. प्रशानाकडून पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारे, तहसीलदार अनिता देशमुख तसेच पुनर्वसन व पाटबंधारे विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. 

चौकट : सर्फनाल्याबाबत प्रशासनाची चांगली भूमिका

सर्फनाला प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रथम प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाचे चांगली भूमिका घेतली आहे. पुनर्वसनाचे काम, जमीनीची उपलब्धता, कमी पडणारी जमीन कोठून उपलब्ध केली जात आहे याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. सर्फनाल्याबाबत प्रशासन सकारात्मक असून धरणग्रस्तांनीही सहकार्य केले आहे. यामुळे लवकरच पुनर्वसनाचे काम पूर्ण होऊन प्रकल्पाचे कामही मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.

                     अशोक चराटी (चेअरमन, आजरा साखर कारखाना)