|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मोदी सरकारकडून अर्थव्यवस्था मोडीत

मोदी सरकारकडून अर्थव्यवस्था मोडीत 

 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांना रिझर्व्ह बँकेकडून 5 लाख कोटींची गंगाजळी  हवी होती. त्याला नकार देऊन उर्जित पटेल यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. सरकारच्या लुटीवर अंकुश ठेवला जात असल्यामुळेच त्यांना पद्धतशीरपणे पदावरून हटविण्यात आले. सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे देशातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांची स्थिती गंभीर बनली आहे. चुकीची धोरणे राबवून मोदी सरकारने देशातील अर्थव्यवस्था मोडीत काढल्याचा घाणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत केला.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे आयोजित विराट जाहीर सभेत त्यांनी भाजपच्या धोरणांवर कडाडून टिका केली. काँग्रेसच्या संधीसाधू धोरणांचा खरपूस समाचार घेत आघडीसाठी अजूनही चर्चेस तयार असल्याचे जाहीरपणे सांगितले. सभेमध्ये ऍड आण्णारावजी पाटील, जयसिंग शेंडगे, प्रा. सुकुमार कांबळे, पार्थ पोळके, नवनाथ पडळकर, सचिन माळी, लक्ष्मण माने, राजा शिरगुप्पे विक्रम कांबळे यांच्यासह आघाडीतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना ऍड.आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी अजून 60 दिवस आहेत. आजतागायत काँग्रेस सोबत आघाडीची चर्चा सुरु असताना आम्ही कधीही जागांबाबत हट्ट धरला नाही. सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी आराखडा तयार करण्याबाबत आम्हाला काँग्रेसकडून अभिवचन हवे आहे. पण त्याकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले आहे.  2019 च्या निवडणुकीमध्ये आम्ही सत्तेवर आलो तर संविधान बदलू असे,  आरएसएस प्रणित भाजपकडून सांगितले जात आहे. याच आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याची आमची प्रमुख मागणी आहे. जागा किती घ्यायच्या हे बैठकीत ठरवले जाईल. पण याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करणारे काँग्रेस खरोखरच आरएसएस विरोधात आहे की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

               काँग्रस आघाडीमध्ये 12 जागांची मागणी

कोणत्या जागा द्यायच्या ते आम्ही काँग्रेसवर सोपवले आहे. ज्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार 3 वेळा पराभूत झाले, ज्या ठिकाणी प्रबळ उमेदवारच नाही अशा 12 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. काँग्रेस आमच्यासोबत राहिले तर देशात 100 जागा निवडून येतील. सध्या देशात चोर कोण आणि चौकीदार कोण हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण आता इतकीच प्रतिक्षा करावी लागणार आहे की पहिले पी. चिदंबरम गजाआड जातात की आणखी कोणी ? असा प्रश्नही ऍड आंबेडकर यांनी उपस्थित केला.

       काँग्रेसचे राज्यातील नेते भाजपसमोर मांजर होतात

ऍड आंबेडकर म्हणाले, काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते भाजपसमोर मांजर होतात. ज्यावेळी ते वाघ होतील, त्यावेळी भाजपसमोर एक तगडे आव्हान उभा राहिल. वंचित बहुजन आघाडीतल प्रत्येकाचे चारित्र्य निष्कलंक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही आमच्यासमोर उभा राहू शकत नाही असे ऍड आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

राफेलमध्ये अर्थिक घोटाळ्याऐवजी स्पेअर पार्टस्च्या हमीचा मुद्दा महत्वाचा

काँग्रेसकडून राफेल खरेदीतील अर्थिक घोटाळ्याबद्दल भाजप सरकारवर आरोप केले जात आहेत. पण ज्या राफेलचे स्पेअर पार्टस् सरकारने फ्रान्सकडून खरेदी केले आहेत, ते पार्टस् पुन्हा देण्याची हमी सरकारने फ्रान्सकडून घेतलेली नाही. त्यामुळे भविष्यात स्पेअर पार्टस्अभावी राफेल विमान भंगारात जाणार आहे. युद्धसामग्री खरेदी करताना त्याच्या वेळोवेळी पुर्ततेची हमी घेणे आवश्यक आहे. पण हा खरा मुद्दा काँग्रेसने उचलेला नाही. काँग्रेसच्या काळात बोर्फोसमध्ये भ्रष्टाचार झाला. पण बोफोर्सच्या बंदुकांची स्पेनने हमी घेतली होती. त्यामुळेच कारगीलमध्ये बोफोर्सच्या बंदुका वाजत राहिल्याचे ऍड. आंबेडकर यांनी अधोरेखीत केले.

                देशातील सरकार लुटारूंचे

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मी स्वच्छ चारित्र्याचा चौकीदार आहे. पण लुटारूंची टोळी असलेल्या या सरकारचे ते नेतृत्व कसे करत आहेत. नोटाबंदीमध्ये देशातील 99.99 टक्के जुन्या नोटा जमा झाल्याचा दावा केला जात असेल, तर गुजरातमध्ये जुन्या नोटय़ा कशा सापडल्या याचे मोदींनी उत्तर द्यावे. नोटाबंदी हाच एक मोठा फ्रॉड आहे. देशातील सहकारी बँकातील आणि नेपाळमधील जुन्या नोटा सरकारने जमा करून घेतलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारचा हा दावा खोटा असल्याचे ऍड. आंबेडकर यांनी सांगितले.

           सत्तेवर आल्यास वंचितांना न्याय देऊ

गेल्या चार वर्षामध्ये बेरोजगारीचे प्रमाण 47 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांचा हा परिणाम आहे. वंचित बहुजन आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास वंचितांच्या कलेला वाव देण्यासाठी त्यांना विनातारण 90 टक्के कर्ज उपलब्ध करून देऊ. त्याच्या कलेला स्वरूप आणि आकार देण्यासाठी शासनाची तिजोरी खाली करू. तरच बिघडलेली अर्थव्यवस्था सुरळीत होईल. समाजाचा उमेदवार पाहून मतदान करण्याऐवजी वंचित आघाडीचा उमेदवार पाहून मतदान करा. दोन वंचित एकत्र आल्याशिवाय सत्ता मिळणार नाही. या आघाडीमध्ये छोटा-मोठा कोणी नसून सर्व समान आहेत. त्यामुळेच अशक्य ते शक्य करायचे आहे. राज्यात वंचितांची 40 टक्के संख्या आहे. प्रास्थापितांची सत्ता उलथवून लावण्यासाठी या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. प्रस्थापितांनी 70 वर्षे सत्ता उपभोगली. आता आम्ही सत्ता घेणार म्हटल्यावर विरोधकांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे वंचितांच्या फोडाफोडीसाठी प्रयत्न होऊ शकतात, त्यांना मतदानादिवशी मतपेटीतूनच उत्तर द्या असे आवाहन ऍड. आंबेडकर यांनी केले.

         चार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर

जाहीर सभेमध्ये ऍड. आंबेडकर यांनी चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारची नावे जाहीर केली. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघतून होलार समाजाचे सहदेव केराप्पा आईवळे, माढामधून विजयराव हनमंतराव मोरे, सांगलीतून जयसिंग उर्फ तात्या शेंडगे, बारामतीमधून नवनाथ विष्णू पडळकर या चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाचा उमेदवार असल्याचे ऍड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ज्या जागा जाहीर केल्या आहेत, त्या जागा वगळून काँग्रेसने जागा वाटपाची चर्चा करावी. जाहीर केलेल्या जागांमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.