|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » थकीत एफआरपी तातडीने द्या, अन्यथा जप्ती

थकीत एफआरपी तातडीने द्या, अन्यथा जप्ती 

प्रतिनिधी/ सांगली

साखर कारखान्यांनी ताबडतोब एफआरपी रक्कम जमा करावी. अन्यथा कारखान्यावर आरआरसीची कारवाई करण्याचा इशारा, मंगळवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दिला. थकीत रक्कम जमा न केल्यास तहसीलदारांनी गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 रोजी कारखान्याची साखर जप्त करून गोदाम सिल करावे. याबाबत पंचनामा करावा अशीही सूचना यावेळी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित साखर कारखान्यांच्या आरआरसी वसुलीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी संबंधित सर्व तहसिलदार, साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, केन ऍग्रो लि. रायगाव साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, साखर जप्त करूनही रकमेची वसुली पूर्ण न झाल्यास कारखान्याच्या मिळकतीवर बोजा नोंद करून लिलावाची कार्यवाही करावी. कारखान्यांची कोणत्याही प्रकारची हरकत, म्हणणे किंवा तक्रार असेल तर त्यांनी साखर आयुक्त, पुणे यांच्याशी संपर्क करावा. ज्या साखर कारखान्यांनी रक्कम जमा केली आहे त्याबाबत त्याचा पुरावा सादर करावा. तसेच शेतकऱयांच्या खात्यावर रक्कम जमा केल्याबाबतचे पुरावेही देण्यात यावेत. शेतकऱयांचे आर्थिक हित लक्षात घेता कोणीही  कारखान्यापैकी कोणत्याही कारखान्यांनी एफआरपीची रक्कम ठेवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 सहकारी संस्था (साखर), यांनी कारखान्यांकडे प्रत्येक कारखान्याच्या आढाव्यासाठी एक अधिकारी अशी नेमणूक करावी. नियुक्त केलेल्या
अधिकाऱयांनी संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधून साखर कारखान्यावर प्रत्यक्ष भेट देऊन वसुलीबाबत काय कार्यवाही केली किंवा करण्यात येत आहे याचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी चार साखर कारखान्यांचा आढावा घेतला. त्यानुसार  निनाईदेवी-दालमिया भारत शुगर लि. कोकरूड  या साखर कारखान्याने 86 टक्के रक्कम जमा केली असून उर्वरीत 14 टक्के रक्कम जमा केलेली नाही. विश्वासराव नाईक या साखर कारखान्याने 80 टक्के रक्कम जमा केली असून उर्वरीत 20 टक्के रक्कम जमा केलेली नाही, असे कार्यकारी संचालक यांनी आढावा बैठकीत सांगितले. महांकाली कवठेमहांकाळ या साखर कारखान्याने रक्कम पूर्ण जमा केली असल्याचे सांगितले. परंतु याबाबत काही पुरावे सादर केलेले नाहीत.

कारखान्यांकडील थकीत एफआरपी रक्कम

दत्त इंडिया लि. संचलित भाडेतत्त्वावर वसंतदादा कारखाना सांगली 62,05,05000, विश्वासराव नाईक शिराळा 57,99,67,000, निनाईदेवी-दालमिया भारत शुगर लि. कोकरूड, 21,22,92,000 महांकाली कारखाना कवठेमहांकाळ 15,85,95,000