|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महिला स्वच्छतागृहावरून प्रशासन धारेवर

महिला स्वच्छतागृहावरून प्रशासन धारेवर 

 

प्रतिनिधी/ सांगली

महापालिकेच्या आरोग्य विभागाला महापालिकेच्या क्षेत्रात 42 ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता गृह उभे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण यातील फक्त 16 ठिकाणीच स्वच्छता गृह निर्माण करण्यात आले आहे. पण त्यातील 8 स्वच्छतागृह सुरूच नाहीत. त्यामुळे अशा कारभारामुळे महापालिकेच्या महासभेत सत्ताधाऱयांनी आणि विरोधक दोघांनी मिळून आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी सकाळी महापौरांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महापालिकेची महासभा महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये सुरवातीलाच या प्रश्नावरून काँग्रेसच्या नगरसेविका सौ. रोहिणी पाटील यांनी आवाज उठविला आणि त्यांनी प्रशासन याबाबत कुंभकर्णासारखे वागत असल्याचा आरोप केला. त्यामुळे हा प्रश्न सुटला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सत्ताधारी नगरसेवक शेखर इनामदार यांनी ही या प्रश्नावर त्रागा करत याबाबत वारंवार चर्चा होवूनही हा विषय का सुटला जात नाही. जर हा प्रश्न सुटत नसेल तर कामे कशी होतील असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी हा स्वच्छता गृहाचा विषय अर्जंट असणारा आहे. हा मागे ठेवू नका. याप्रश्नी तातडीने निर्णय घ्या अशी मागणी केली. त्यावेळी सत्ताधारी नगरसेविका भारती दिगडे यांनी हे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी केली. तसेच प्रशासन याबाबत का सुस्तावले असा सवालही त्यांनी केला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता हारगे यांनी कोणाच्या सांगण्यामुळे ही स्वच्छतागृह होत नाहीत असे सवाल केला. तसेच नागरिकांचा प्रश्न महत्वाचा असताना याकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही अस सवाल त्यांनी केला. तसेच हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.

या प्रश्नावर सर्व नगरसेवकांच्या भावना लक्षात घेवून महापौर सौ. संगीता खोत यांनी या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्यासाठी बुधवारी सकाळी महापौर दालनात या संदर्भात बैठक घेण्याचे आदेश दिले. यामध्ये महापालिकेचे दोन्ही उपायुक्त, आरोग्य अधिकारी, शहर अभियंता यांनी या बैठकीला येणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे या बैठकीत याप्रश्नावर निकाल होईल असे त्यांनी सांगितले.

वैयक्तिक शौचालयाचे अनुदानही थकीत

महापालिकेने नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्याचे मान्य केले आहे. पण अनेक नागरिकांना अनुदान देण्यात आले नाही. ते तातडीने मिळावे अशी मागणी नगरसेवक विष्णु माने यांनी केली. या प्रश्नावरही या बैठकीत तोडगा काढण्यात येईल असेही महापौर सौ. खोत यांनी सांगितले.

 एलईडी बल्बची खरेदी करण्यास मान्यता

महापालिकेकडून शहरातील विविध भागात एलईडी बल्ब लावण्यात येणार आहेत. पण ही बल्बची खरेदी करण्यास मात्र प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यानंतर याप्रकरणी तातडीने साडेतीन कोटीपैकी काही रक्कमेचे एलईडी बल्ब खरेदी करण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले. त्यामुळे ही बल्ब खरेदीही तातडीने होणार आहे.