|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » डोळे फक्त 100 कोटीकडे लागून

डोळे फक्त 100 कोटीकडे लागून 

विनायक जाधव/ सांगली

महापालिकेवर इतिहासात प्रथमच भाजपाचा झेंडा फडकल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुश होवून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला सुवर्ण नगरोत्थान योजनेतून 100 कोटी रूपये विकासकामांना देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर महापालिकेच्या पदाधिकाऱयांनी आणि प्रशासनाने प्रयत्न करून 434 कामांचा समावेश असणारी 146 कोटीच्या विकासकामांच्या प्रस्तावाची फाईल मंत्रालयात सादर केली आहे. ही फाईल सादर करून आता जवळपास दीड आठवडय़ाचा कालावधी लोटला आहे. या कामांना तातडीने मंजूरी येण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या कामांना दोन दिवसात मंत्रालयातून मान्यता मिळाल्यास हा निधी येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे महापालिकेचे डोळे हे या 100 कोटीकडे लागून राहिले आहेत.

केंद्र सरकारची मुदत मे महिन्यात संपत आहे. यामुळे  लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता ही मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात सर्वत्र लागू होवू शकते. ही आचारसंहिता लागू होण्यापुर्वीच या 100 कोटीच्या कामांच्या निविदा काढून त्यांना मान्यता देण्याचे काम तातडीने करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी तर मंत्रालयात तळ ठोकून ठेवला आहे. या 100 कोटीच्या निधीमुळे महापालिकेच्या विकासाला  बळ मिळणार आहे. निधी नसल्याने अनेक जी कामे रखडली होती. ती कामे या 100 कोटीच्या निधीतून होणार आहेत. त्यामुळे तीन्ही शहराच्या विकासकामांना चांगलीच चालना मिळणार आहे. या विकासकामांतून शहराचे रूपटे पालटले जाणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन्ही शहरातील गरजेची आणि महत्वपुर्ण असणारी विकासकामे यामध्ये समाविष्ठ करण्यात आली आहेत. त्यामुळे या 100 कोटीच्या मंजूरीकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत.

आचारसंहितेपुर्वी निविदांना मंजूरी दिली तरच त्याचा फायदा

लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापुर्वी 100 कोटीच्या निविदा प्रकाशित करून त्या निविदांना तातडीने मंजूरी देणे, हे महापालिकेचे आद्यकर्तव्य ठरणार आहे. कारण जर हा निधी आचारसंहितेत अडकला तर मात्र या कामांच्या मंजूरीसाठी जून महिन्याची वाट पहावी लागणार आहे. जून महिन्यात या कामांना मंजूरी दिल्यानंतर ही कामे तातडीने सुरू करता येत नाहीत. रस्ते तयार करणे, डांबरीकरण करणे अशी अनेक कामे ही पावसाळय़ात केली जात नाहीत. ही कामे पावसाळा झाल्यानंतरच करावी लागणार आहेत. त्यामुळे आणखीन चार महिन्याचा कालावधी यामध्ये जाणार आहे. हा कालावधी जावू नये, यासाठीच महापालिकेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तातडीने ही कामे मंजूर करून या कामांचे वर्क ऑर्डर दिल्यानंतर ही कामे आचारसंहितेत आणि उन्हाळय़ात सुरू होतील आणि ती लवकरात लवकर पूर्णही होतील. त्यामुळे लोकांना ही विकासकामे दिसणार आहेत.

संपूर्ण 100 कोटी रूपये राज्यशासन देणार

महापालिकेला ज्यावेळी सुवर्ण नगरोत्थान योजनेतून 100 कोटीचा निधी देण्याचे  मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते. त्यावेळी त्यांनी महापालिकेचा यामध्ये 30 टक्के वाटा असणे गरजेचे आहे अशी अट घातली होती. म्हणजे प्रत्यक्षात राज्यशासनाकडून महापालिकेला फक्त 70 कोटी रूपयेच येणार होते. आणि महापालिकेचे 30 कोटी त्यामध्ये समाविष्ठ करून ही 100 कोटीची कामे करण्यात येणार होती. पण आता तसे असणार नाही. संपूर्ण 100 कोटीचा निधी राज्य शासन देणार आहे. तशी मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्थायी समितीत तसा ठराव करण्यात आला आहे. हा ठरावही या 100 कोटीच्या कामांच्या प्रस्तावासोबत जोडण्यात आला आहे. त्यामुळे आता संपूर्ण 100 कोटी रूपये महापालिकेला मिळणार आहेत. यामुळे महापालिकेच्या 30 कोटीची बचत होणार आहे. महापालिकेच्या प्रशासनाने मंत्रालयातील अधिकाऱयांशी आणि राजकीय नेत्यांशी चर्चा केल्यामुळे हे घडले आहे. अन्यथा महापालिकेला स्वतःचे 30 कोटी रूपये यामध्ये घातल्याशिवाय महापालिकेला हे 100 कोटी रूपये मिळणे अशक्य होते. पण आता संपूर्ण 100 कोटी रूपये महापालिकेला मिळणार आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. 

तातडीने निविदा काढण्यात येणारः अजिंक्य पाटील

महापालिकेने सुवर्ण नगरोत्थान योजनेसाठी 434 कामांचे 146 कोटीचे प्रस्ताव मंत्रालयात सादर केले आहेत. या प्रस्तावाला राज्यशासनाकडून मंजूरी मिळाल्यानंतर तातडीने या कामांच्या निविदा प्रकाशित करण्यात येणार आहेत. ज्या निविदा अल्पमुदतीच्या काढाव्या लागणार आहेत. त्या निविदा तातडीने काढल्या जातील आणि त्यांना तातडीने मंजूरी देण्यात येईल. त्यामुळे ही कामे तातडीने सुरू करता येतील असे स्थायी समिती सभापती अजिंक्य पाटील यांनी सांगितले. 

आचारसंहितेपुर्वी ही कामे सुरू करण्यासाठी प्रयत्नः महापौर

लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापुर्वी या कामांना मंजूरी देवून ही कामे तातडीने सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मंत्रालयातील मंजूरी घेण्याकामी प्रशासनातील उच्चपदस्थ प्रयत्न करत आहेत. येत्या दोन दिवसात या कामांना मंजूरी मिळाल्यास ही कामे आचारसंहितेपुर्वी सुरू करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. या कामे शहराच्या विकासासाठी माईलस्टोन ठरणार आहेत. असे महापौर सौ. संगीता खोत यांनी सांगितले. 

पहिले यश मिळाले आता दुसरे यश ही मिळेलः आयुक्त

महापालिकेच्या प्रशासनाने मंत्रालयात महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे समजावून सांगून त्यांच्याकडून संपूर्ण 100 कोटी रूपये मंजूर करण्यात पहिले यश प्राप्त केले आहे. आता ही सर्व कामे तातडीने मंजूर करण्याचे दुसरे यशही लवकरात लवकर मिळेल आणि त्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसात हे दुसरे यश आपणास मिळालेले दिसेल असे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले.