|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सिध्देश्वर कुरोली उपसरपंचपदाचा सामना टाय

सिध्देश्वर कुरोली उपसरपंचपदाचा सामना टाय 

प्रतिनिधी/ वडूज

सिध्देश्वर कुरोली (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूकही सरपंचपदाप्रमाणे अतिशय चुरशीची झाली. या निवडणुकीत विरोधी सर्वपक्षीय परिवर्तन आघाडीस काँग्रेसचे दोन सदस्य फोडण्यात यश आल्याने उपसरपंच पदाचा सामना ‘टाय’ झाला. काँग्रेसचे उमेदवार अमरजीत देशमुख व विरोधी सदस्याच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल केलेले बंडखोर छगन पाटोळे या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 7 मते पडली. सरपंच शीतल देशमुख यांनी आपले महत्त्वपूर्ण कॉस्टींग वोट काँग्रेसच्या उमेदवारास दिल्याने अमर देशमुख यांची ‘जीत’ होण्याबरोबर काँग्रेसची ‘देशमुखी’ अबाधित राहिली.

उपसरपंच पदासाठी सरपंच शीतल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत गुप्त मतदान पध्दतीने मतदान करण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये अमरजीत देशमुख यांची निवड झाली. या निवडीकामी त्यांना सरपंच सौ. देशमुख यांच्यासह शिवाजी साठे, भारती रणधीर देशमुख, माधवी वैभव ननावरे, आशा सर्जेराव फडतरे, निलम कांबळे यांनी सहकार्य केले. तर छगन पाटोळे यांना त्यांच्या प्रभागातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या सदस्या सिंधू बागल यांच्यासह अनुज देशमुख, नीलेश देशमुख, गोरख बनसोडे, मंगल देशमुख, रुपाली देशमुख यांनी सहकार्य केल्याचे समजते. निवडीनंतर उपसरपंच देशमुख यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख व सहकाऱयांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आताषबाजी करत जल्लोष व्यक्त केला.

यावेळी माजी सरपंच शहाजी देशमुख, पृथ्वीराज देशमुख आदींसह पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. देशमुख व उपसरपंच अमरजीत देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेने दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून गावामध्ये विकासकामांची गती कायम राखणार आहे. तसेच विविध प्रकारचे उपक्रम आपल्या गावात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.