|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भ्याड हल्ल्याचा बदला पाकिस्तानवर हल्ला करूनच घ्या

भ्याड हल्ल्याचा बदला पाकिस्तानवर हल्ला करूनच घ्या 

प्रतिनिधी/ बेळगाव

सीआरपीएफच्या ताफ्यावर गुरुवारी काश्मीरमध्ये भीषण हल्ला झाला. यामध्ये 40 जवान हुतात्मे झाले. हा हल्ला पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला आहे. त्यामुळे या हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार असून आता त्याचा बदला भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला करून घ्यावा, अशी मागणी शुक्रवारी विविध हिंदू संघटनांच्यावतीने करण्यात आली आहे.

हिंदू जनजागृती समिती, विश्व हिंदू परिषद-बजरंग दल आणि श्रीराम सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. पाकिस्तानला धडा शिकविणे गरजेचे आहे. केवळ सर्जिकल स्ट्राईक म्हणून थांबायचे नाहीतर पाकिस्तानला पूर्णच नेस्तानाबूत करण्याची वेळ आली आहे. तेव्हा त्या दृष्टिने पाऊल उचलून एकदाच पाकिस्तानला धडा शिकवावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर परिसरात दहशतवादी संघटना नेहमीच कार्यरत आहेत. आपल्या देशात राहून आमच्याशी ते गद्दारी करत आहेत. अशा फुटीरवाद्यांना दिसताच क्षणी गोळय़ा घालण्याचे आदेश द्यावेत, असेही या निवेदनात म्हटले आहे. केवळ राजकीय निर्णयाच्या अभावामुळे सैनिकांचे बळी जात आहेत. तेव्हा राजकारण सोडून आता त्यांना धडा शिकविणे ही काळाची गरज बनली आहे.

पाकिस्तानच्या हद्दीमध्ये अनेक दहशतवादी अड्डे आहेत. त्या ठिकाणीही सर्जिकल स्ट्राईक करावे. याचबरोबर पाकिस्तान सैन्यांना पळो की सळो करावे. तेव्हाच पाकिस्तानला अद्दल घडणार आहे. तेव्हा त्या दृष्टिने पाऊल उचलावे, अशी मागणी या हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची मागणी

विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाच्यावतीने तर तातडीने पाकिस्तानवर हल्ला करून त्या पाकिस्तानचे कबरस्तान करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. श्रीराम सेनेच्या पदाधिकाऱयांनीही अशाच तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. याचबरोबर विश्व हिंदू परिषदने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची मागणी केली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून पाकिस्तानचा आणि दहशतवादी संघटनांचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बजरंग दल जिल्हाध्यक्ष भावकाण्णा लोहार, आदिनाथ गावडे, गजानन बिरादार, नरेश शिंदे, सुनील कणेरी, संकेश बेनके, कृष्णकांत गौंडाडकर, पिंटू कडोलकर, श्रीराम सेनेचे, विनायक अंग्रोळी, शिवराज नायक, विनायक कडोलकर, रमेश गुडगुंदगी, सुनील मुतगेकर, अभिजित भातकांडे, हिंदू जनजागृतीचे सुधीर हेरेकर, विजय कुमार टी., प्रशांत राणे, संदीप भिडे, वेंकटेश शिंदे, राजू पाटील, एम. बी. कोंकण, श्रीनिवास सक्री, संजय चिंडेकर, ऋषीकेश गुर्जर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: