|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सुभाष भोसलेच्याच रिव्हॉल्व्हरमधून फायरिंग!

सुभाष भोसलेच्याच रिव्हॉल्व्हरमधून फायरिंग! 

फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त

वार्ताहर / कणकवली:

जानवली-आदर्शनगर येथील गृहनिर्माण सोसायटी व सदर इमारत बांधणारा बिल्डर सुभाष श्रीधर भोसले यांच्यातील वादातून रिव्हॉल्व्हरमधून फायरिंग केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रिव्हॉल्व्हरचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाला आहे. पोलिसांनी तपासणीसाठी पाठविलेल्या रिव्हॉल्व्हरमधून सुभाष भोसले याने फायरिंग केल्याचा अहवाल आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिली. याप्रकरणी भोसले याने आत्मसंरक्षण शस्त्र परवान्याच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी भोसले याचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती श्री. कोळी यांनी दिली.

14 ऑक्टोबर 2018 रोजी ‘मॉर्निंग वॉक’वेळी साईसृष्टी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष किशोर अनंत दाभोलकर (रा. जानवली-वाकाडवाडी) यांना ठार मारण्याची धमकी देत तेथे असलेल्या कुत्र्याच्या दिशेने रिव्हॉल्व्हरमधून भोसले याने दोन राऊंड फायर केल्याची फिर्याद दाभोलकर यांनी दिली होती. ही घटना जानवली-सखलवाडी रस्त्यावर साकेडी फाटा येथे घडली होती. श्री. दाभोलकर यांच्या तक्रारीनुसार सुभाष भोसले याच्याविरोधात सुरुवातीला भादंवि कलम 506 अन्वये अदखलपात्र गुन्हा व नंतर भारतीय हत्यार अधिनियमच्या कलम 30 अन्वये (शस्त्र परवान्याचे उल्लंघन करणे) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाभोलकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, साईसृष्टी सोसायटी व बिल्डर सुभाष भोसले यांच्यात वाद आहेत. चार वर्षांपूर्वी या बिल्डिंगचे निकृष्ट बांधकाम करून फसवणूक केल्याप्रकरणी दाभोलकर यांनी ग्राहक संरक्षण मंच तसेच सोसायटीमार्फत सन 2015 मध्ये सार्वजनिक सोयीसुविधा अंतर्गत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दिवाणी न्यायालय, कणकवली यांच्याकडे तक्रारही केली आहे. याच रागातून भोसले याने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून दोन राऊंड फायर केले होते.

याप्रकरणी अधिक तपसासाठी भोसले याने शस्त्र परवाना व रिव्हॉल्व्हर पोलिसात जमा केले होते. सदरचे रिव्हॉल्व्हर मुंबई येथील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (हत्यार तपासणी विभाग) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या प्रयोगशाळेच्या अहवालात त्याच रिव्हॉल्व्हरमधून फायरिंग झाल्याचे म्हटले आहे.

Related posts: