|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शाब्दिक पाठिंबा!

शाब्दिक पाठिंबा! 

एखाद्या गंभीर प्रसंगातून व्यक्तीची वाटचाल सुरू असेल तर त्यावेळी त्याला शाब्दिक पाठिंबा देणेही महत्त्वाचे असते. तो दिलासा बळ वाढविण्याचेच काम करतो. देशाच्या बाबतीतही असे बळ आणि पाठिंबा वेळेवर मिळणे आवश्यक असते. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर असा अनेकांचा पाठिंबा मिळाला. चीन आणि पाकिस्तानचा बुरखाही त्यातून फाटला. चीन व इम्रान खानचे नाटकही जगाने पाहिले. दहशतवाद्यांना पोसण्यासाठी चीन नेहमीच पाकिस्तानला मदत करत आला आहे. त्यामुळेच धक्का बसल्याचे सांगणारा चीन दहशतवादी मसूद अजहर आणि त्याचा भाऊ असगर याला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत घालण्यास मात्र आढेवेढे घेऊ लागला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने दहशतवाद्यांना पोसू नका, त्यांना आश्रय देऊ नका असे आवाहन युनोचे सभासद असलेल्या सर्व राष्ट्रांना केलेले आहे. अर्थात हे सर्वांसाठीचे आवाहन असले तरी ते पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर केलेले आहे. पाकिस्तान आणि चीनला उद्देशूनच ते आहे हे सगळय़ा जगाला माहिती आहे. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने भारताला या लढाईत पूर्ण पाठिंबा व्यक्त केलेला आहेच. ट्रम्प यांचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताला स्वसंरक्षणाचा हक्क आहे असे म्हटलेले आहे. परराष्ट्रमंत्री पॉम्पियो, व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा साँडर्स यांनी जैश-ए-मोहंमदवर कारवाईची आवश्यकता व्यक्त केलेली आहे. जैशच्याच आदिल डार याने आत्मघातकी हल्ला केला होता. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी निषेध करतानाच योग्य वेळी अमेरिका आपले म्हणणे जाहीर करेल असे सांगितले होते. दरम्यान त्यांच्याच सल्लागार, परराष्ट्र मंत्री आणि माध्यम सचिवांनी भारताच्या बाजूने भूमिका घेऊन भारतीय भावनेला पाठबळ दिलेले आहे. हे सर्व घडत असतानाच ज्यांच्या भक्कम आर्थिक पाठबळावर पाकिस्तानी नाग डोलतो त्या सौदी अरेबियाचे राजपुत्र सलमान हे आधी पाकिस्तानात जाऊन आता भारतभेटीवर आलेले आहेत. पाकिस्तानला भली मोठी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. या राष्ट्राला आणि दहशतवाद्यांनाही अप्रत्यक्षरित्या पाठबळ हेच लोक पुरवत असतात. तेलाच्या समृद्धीतून आलेला पैसा कुठे उडवावा हेही न ठरवता आलेले हे राजघराणे जशा पद्धतीने पैसा उधळत असते ते पाहता त्याच्या गाडीवर आर्थिकदृष्टय़ा दिवाळखोर पाकिस्तानच्या पंतप्रधानाने ड्रायव्हरकी केली तर आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. मात्र त्यांना भेटून भारतात आल्यानंतर या राजपुत्राची भाषा बदलली. भुताच्या मुखातून भागवत बाहेर पडावे तसे भाषण राजपुत्राकडून भारतीय माध्यमांसमोर देण्यात आले. पुलवामा हल्ल्याबद्दल कोणतेही अधिकृत भाष्य न करता भारताचे आणि सौदीचे रक्ताचे नाते आहे, दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आम्ही संपूर्ण सहकार्य करू, कट्टरतावाद आणि दहशतवादाविरुद्ध लढताना इंटेलिजन्ससह सर्व सहकार्य करू, भारतीय आयटी व अन्य क्षेत्रात 40 अब्ज डॉलरपासून 100 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करू वगैरे वक्तव्य त्यांनी केले आहे. अर्थात तेलाची आपणास सक्त आवश्यकता आहे आणि तेही भारतीय रुपयामध्ये तेलाची किंमत स्वीकारण्यास सौदी राजपुत्राला तयार करण्याची भारताची गरज आहे. त्यामुळे त्याचे कीर्तन ऐकण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्याच्यासमोर पंतप्रधान मोदी यांनी मान डोलवणे, मिठी मारणे आणि सहकार्याबद्दल आभार मानणे ही एक राष्ट्रप्रमुख म्हणून मोदी यांची जबाबदारीच होती. ती त्यांनी पार पाडली तर त्यावर टीका होता कामा नये. तसेही आल्या पाहुण्याचे स्वागत करण्याची आपली संस्कृती आहे. त्यामुळे सौदी राजपुत्राचे स्वागत भारतात झाले असेल तर त्यात गैर काही मानण्याचे कारण नाही. कारण, आज दहशतवादाच्या विरोधातील लढाईत भारत होरपळत असला तरी कधीकाळी तेलासाठी हा दहशतवाद जन्माला घालणाऱया अमेरिकेपासून ते सौदी राजघराण्यातील प्रत्येक कुटुंबीयांपर्यंत प्रत्येकाला किंमत मोजावी लागलेली आहे. सौदी राजवंशाचा रक्ताळलेला इतिहासही दहशतवादापासून दूर राहिलेला नाही आणि त्यांची मदतही कधी थांबलेली नाही. पण, आजच्या आणीबाणीच्या प्रसंगी भारताला अशा प्रत्येक शब्दाला आपल्या भात्यात साठवून ठेवणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात कधीतरी हे शब्दही शस्त्र म्हणून वापरता येऊ शकतात. शेवटी दहशतवादाविरोधात लढाई भारताला स्वतःच्या ताकदीवरच लढायची आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण रोज नवे वळण घेत असते. कोणता देश कधी पलटी मारेल आणि कोणता देश कधी पाठीशी उभा राहिल सांगता यायचे नाही. चीनचा जागतिक दबदबा वाढलेला दिसला की इतर देश त्याच्या बरोबर उलटी भूमिका घेतात. तशाच पद्धतीने सध्या अमेरिकेने आधी पाकिस्तानला आणि नंतर चीनला सल्ला देऊन डिवचले आहे. जागतिक परिस्थितीत तेलसंपन्न राष्ट्रे अडचणीत आहेत हे लक्षात येताच ओबामा प्रशासनाने धडक कारवाई करत पाकिस्तानात लपून बसलेल्या ओसामा बीन लादेनला पाकिस्तानात घुसून टिपले. त्याचा मृतदेह चिमटीत पकडून समुद्राच्या तळाशी नेऊन गाडला आणि नंतर सगळय़ा जगाला ते चित्र दाखवले. पैशाची चणचण भासत असलेल्या तेलसंपन्न इस्लामी राष्ट्रांना किंवा पाकिस्तानलाही तेव्हा अमेरिकेच्या विरोधात डराव, डराव करता आले नाही. या बाबी लक्षात घेतल्या तर योग्य वेळ येईल तेव्हासाठी भारताच्या खात्यात जमा झालेली ही शाब्दिक सहानुभूती वापरून भारतही संधी साधू शकेल. तोपर्यंत सौदी राजपुत्र असो, चीन असो की अमेरिका प्रत्येकाचा शब्द मोलाचाच आहे, त्यांचेच दात त्यांच्याच घशात घालण्याची संधी भारताला मिळेल. अपना भी दिन आयेगा हेच आज होरपळलेला भारत जगाला सांगतो आहे. कारण, त्या राष्ट्रात आणि भारतात फार अंतर नाही. आज भारताला तापदायक ठरलेले भस्मासूर उद्या पाकिस्तान, सौदी, चीनच्या टाळूवरही हात ठेवणारच आहेत.

 

Related posts: