|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बांगलादेशात अग्नितांडव, 81 जणांचा होरपळून अंत

बांगलादेशात अग्नितांडव, 81 जणांचा होरपळून अंत 

वृत्तसंस्था /ढाका :

जुना ढाकामधील चौकबाजार परिसरातील रसायनांचा साठा ठेवलेल्या चार मजली इमारतीला बुधवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. इमारतीमध्ये असणाऱया सिलिंडरचा स्फोट झाल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत जवळ असणाऱया चार इमारतींनाही कवेत घेतले. या दुर्घटनेत 81 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच मुलांसह नऊ महिलांचा समावेश आहे. 50 हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे.

जुन्या ढाका शहरातील जुन्या परिसरातील चौकबाजारमधील हाजी वाहेद या चार मजली इमारतीला रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी आग लागली. इमारतीमधील खालच्या मजल्यावर केमिकल पदार्थांसह प्लास्टिकच्या वस्तू व बॉडी स्प्रे ठेवण्यात आले होते. तर वरील मजल्यांवर रहिवासी होते. आग लागल्यानंतर इमारतीमधील सिलिंडरचे स्फोट झाला. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. इमारतीमध्ये जवळच्या चार इमारतींनाही आगीने आपल्या कवेत घेतले. या इमारतींमधील रहिवासी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

अरूंद गल्लीबोळांमुळे अग्निशमनला अडचणी

परिसरात असणाऱया अरूंद बोळीमुळे याचवेळी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. इमारतींच्या प्रवेशद्वाराला कुलूप असल्याने रहिवाशांना बाहेर पडता आले नाही. तत्काळ अग्निशमन दलाच्या 200 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या.  अरूंद गल्ल्यांमुळे अग्निशमनच्या कामात अडथळे आले. अग्निशमन दलाने हेलिकॉप्टरच्या मदतही घेतली. तब्बल 14 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या भीषण दुर्घटनेत 81 जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमींवर उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती दक्षिण ढाकाचे महापौर सईद खोकोन यांनी व्यक्त केली.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

आतापर्यत 45 मृतदेहांची ओळख पटली आहे. आगीत संपूर्ण भाजलेले मृतदेह ओळखण्यात अडचणी येत आहेत. बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमीद, पंतप्रधान शेख हसीना यांनी या दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 2010 मध्ये जुन्या ढाका येथील एका इमारतीला लागलेल्या आगीत 120 जण ठार झाले होते. या दुघटनेनंतरही जुना ढाक्यातील 800 गोडावून शहराबाहेर हलविण्याचे आदेशही प्रशासनाने दिले होते. मात्र ही प्रक्रिया कागदावरच राहिली. 2013 मध्ये ढाका येथील एका कापड कारखान्याला लागलेल्या आगीत 1,100 कामगारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये हजारो कामगार जखमीही झाले होते.