|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राफेल विषयक निर्णयाची समीक्षा करणार न्यायालय

राफेल विषयक निर्णयाची समीक्षा करणार न्यायालय 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

राफेल व्यवहाराबद्दल दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करणाऱया याचिकेवर सुनावणीची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे. वकील प्रशांत भूषण यांच्या याचिकेकरता विशेष खंडपीठ स्थापन केले जाईल असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे. राफेल प्रकरणी अनेक पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या असून लवकरच त्यावर सुनावणी सुरू होईल असे न्यायालयाने सांगितले आहे.

राफेल प्रकरणी नवी माहिती समोर आली असून न्यायालयाने ती विचारात घ्यावी असे प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर म्हटले आहे. राफेल प्रकरणाची सुनावणी खुल्या न्यायालयात व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. मागील वर्षी न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारची बाजू मांडणाऱया अधिकाऱयांनी चुकीची माहिती सादर केली होती. या अधिकाऱयांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा दावा भूषण यांनी केला आहे.

सरकारला क्लीनचिट

सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2018 मध्ये न्यायालयाच्या देखरेखीखाली राफेल व्यवहाराच्या चौकशीची मागणी करणाऱया सर्व याचिका फेटाळल्या होत्या. राफेलच्या खरेदी प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नाही. यात व्यावसायिक भेदभाव झाल्याची कोणतीही बाब समोर आली नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयीन समीक्षेचा नियम निश्चित नाही. राफेल व्यवहाराच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नाही. 36 विमानांच्या खरेदीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.

प्रक्रिया नियमांशी सुसंगत

रिलायन्सला ऑफसेट भागीदार निवडण्याच्या प्रक्रियेत व्यावसायिक लाभ मिळवून दिल्याचा कोणताही पुरावा नाही. लढाऊ विमानांच्या सज्जतेत कोणत्याही प्रकारची कमतरता देश झेलू शकत नाही. काही लोकांच्या धारणेच्या आधारावर आदेश दिला जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते.