|Sunday, August 25, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत-इंग्लंड महिला संघात आज पहिली वनडे

भारत-इंग्लंड महिला संघात आज पहिली वनडे 

मुंबई / वृत्तसंस्था :

भारतीय महिला संघ आज (दि. 22) इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली वनडे खेळेल. अलीकडेच न्यूझीलंड महिला संघाचा फडशा पाडला असल्याने भारतीय महिला संघाचे मनोबल उंचावलेले आहे. त्याचा येथे या संघाला लाभ होऊ शकेल. आयसीसी चॅम्पियनशिपचा एक भाग असलेल्या या मालिकेतील तिन्ही सामने वानखेडे स्टेडियमवरच खेळवले जाणार आहेत. अर्थात, इंग्लिश महिला संघात अनेक मातब्बर खेळाडूंचा समावेश असल्याने घरच्या मैदानावर खेळत असतानाही भारताला त्यांना कमी लेखून चालणार नाही.

या छोटेखानी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची बरीचशी भिस्त सलामीवीर स्मृती मानधनावरही असणार आहे. स्मृतीने न्यूझीलंडविरुद्ध 196 धावांची आतषबाजी करत सांघिक यशात मोलाचा वाटा उचलला होता. 200 वनडे खेळणारी मिताली राज देखील येथे लक्षवेधी कामगिरी साकारु शकेल. यजमान संघाला हरमनप्रीत कौरची मात्र उणीव जाणवू शकते. कौरला गुडघ्याच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावे लागले आहे. तिच्या जागी हर्लिन देओलची संघात वर्णी लागली. जेमिमा रॉड्रिग्यूज व पूनम राऊत यांच्यापैकी कोणाला प्राधान्य मिळेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पूनम राऊतने आपली शेवटची वनडे लंकेविरुद्ध गतवर्षी सप्टेंबरमध्ये खेळली आहे.

मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाला मध्यफळीत अनेक चिंता सतावत आल्या असून प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण त्यावर उपाययोजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. अर्थात, इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाला सामोरे जाणे तितके सहजसोपेही अजिबात नसेल. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजीची भिस्त अनुभवी झुलन गोस्वामी, शिखा पांडे व मानसी जोशी यांच्यावर असेल. दीप्ती शर्मा, एकता बिश्त, पूनम यादव फिरकी गोलंदाजीची आघाडी सांभाळतील.

इंग्लिश संघाला फलंदाजीच्या आघाडीवर डॅनी वॅट (61 सामन्यात 746 धावा), 28 वर्षीय हिदर नाईट (86 वनडेत 2331 धावा) यांच्याकडून अधिक अपेक्षा असणार आहेत. या संघात सोफी एक्लेस्टोन ही अष्टपैलू खेळाडू असून ऍना व स्कीव्हर मध्यमगती गोलंदाजीची धुरा सांभाळतील. यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात ऍनाने 4 बळी घेत फॉर्म अधोरेखित केला होता.

संभाव्य संघ

भारतीय महिला संघ : मिताली राज (कर्णधार), झुलन गोस्वामी, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्यूज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), आर. कल्पना (यष्टीरक्षक), मोना मेश्राम, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, शिखा पांडे, मानसी जोशी, पूनम राऊत, हर्लिन देओल.

इंग्लिश महिला संघ : तॅमी बेमाऊंट, कॅथरिन ब्रन्ट, कॅटे क्रॉस, सोफिया डंकली, सोफी इक्लेस्टोन, जॉर्जिया एल्विस, ऍलेक्स हॅर्टली, ऍमे जोन्स, हिदर नाईट, लॉरा मार्श, नॅट स्कीव्हर, ऍना श्रबसोल, सारा टेलर (यष्टीरक्षक), लॉरेन विनफिल्ड, डॅनी वॅट.