|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » देशाला सक्षम नेतृत्वाची गरज म्हणत पवारांनी उमेदवारी केली मान्य

देशाला सक्षम नेतृत्वाची गरज म्हणत पवारांनी उमेदवारी केली मान्य 

प्रतिनिधी /कुर्डुवाडी :

भाजप सरकारच्या कारभारावर टीका करत तसेच आता देशाला सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत शरद पवार यांनी माढा लोकसभेसाठी उमेदवारी मान्य केली. पूर्वीच्या टर्ममधील कामांचा आढावा टाळतानाच आगामी कामाच्या व्हीजनबाबतही त्यांनी मौन पाळले.

  पिंपळनेर येथील संकेत मंगल कार्यालयात गुरुवारी माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी कार्यकत्र्यांचा मेळावा झाला. कार्यकर्त्यांनी विनंती केली आणि ती मान्य करावी लागली, अशा नियोजनाप्रमाणे मेळावा यशस्वी झाला. भाजपच्या जाचातून शेतकरी, व्यापारी, बँका, न्यायालय आणि सीबीआय खातेही सुटले नाही. त्यामुळे देश संकटात सापडला असल्याचे पवारांनी सांगितले. नोटाबंदीने भ्रष्टाचार कमी झाला नाही, जीएसटीने संबंध देशातील व्यापार ठप्प झाला, शेतकऱयांना सरसकट कर्ज माफी मिळालीच नाही, देशाची सुरक्षाही धोक्यात आली, अशा विविध विषयावर टिकेची झोड उठवत समविचारी लोकांना एकत्र करण्याची गरज असल्याचे पवार यांनी मत व्यक्त केले.

  पूर्वी पैसे खाल्ले की बोफोर्स केला असे म्हटले जायचे आता पैसे खाल्ले की राफेल केला असे लोक म्हणतील.

  देशाला सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगताना त्यांनी पंतप्रधान पदाच्या आशेचे संकेतही दिले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भाषणातील उमेवारीच्या विनंतीचा आधार घेत पवारांनी माढा लोकसभेची उमेदवारी मान्य असल्याचे स्पष्ट केले.

  प्रास्ताविकात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे-पाटील यांनी पवारांनी माढय़ातून निवडणूक लढवावी म्हणून मेळावा होत असल्याचे सांगितले. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी पवारांच्या केंद्रीय कृषी मंत्री काळातील कर्तृत्वाचा पाढा वाचला. त्या काळात कृषी खात्याची प्रगती अचंबीत करणारी ठरल्याचे सांगितले. आ. बबनदादा शिंदे यांनी पवारांनी सर्व योजनांचा भरघोस निधी माढा मतदार संघासाठी दिल्याचे सांगितले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पवार यांनी माढय़तून निवडणूक लढवावी, अशी विनंती केली.

  आ. दिलीप सोपल यांनी काही आठवणी सांगून पवारांच्या तत्पर कार्यशैली विषद केली. या मेळाव्याला माजी खा. रणजतसिंह मोहिते-पाटील, माजी आ. विनायकराव पाटील, माजी आ. राजन पाटील, माजी जि.प. अध्यक्षा निशिगंधा माळी, जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे, बळीरामकाका साठे, राजूबापू पाटील, जयमाला गायकवाड, रमेश बारसकर, सुभाष गुळवे, माढा पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे, धनराज शिंदे, यासह माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. माढा तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील यांनी आभार मानले.