|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनपाची अर्थसंकल्पीय बैठक आज

मनपाची अर्थसंकल्पीय बैठक आज 

प्रतिनिधी /बेळगाव :

महापालिका अर्थसंकल्प मांडण्यासाठी बैठक आयोजित करण्यासाठी अखेर महसूल स्थायी समिती अध्यक्ष तयार झाले असून शुक्रवार दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. बैठकीत अर्थ, कर आणि महसूल स्थायी समिती बैठकीत अर्थसंकल्पाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. लागलीच शनिवार दि. 23 रोजी दुपारी 3 वाजता सभागृहाच्या बैठकीत अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

अर्थसंकल्प बैठक आयोजित करण्यासाठी गुरुवारी नोटिसा पाठवून अर्थसंकल्प बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्यावतीने दरवषी अर्थसंकल्प केला जातो, पण काही मोजकीच विकासकामे अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे होत असतात. यामुळे यंदा नव्या तरतुदी अर्थसंकल्पात करण्याऐवजी जुने प्रस्ताव मार्गी लावण्यासह महसूल वाढविण्याच्या सूचना सामाजिक संस्था, समाजसेवक आणि व्यावसायिकांनी केल्या होत्या. यामुळे 2019-20 च्या अर्थसंकल्पात कोणत्या नव्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, याची माहिती शुक्रवारी आयोजित करण्यात येणाऱया अर्थ, कर आणि महसूल स्थायी समिती बैठकीत घेण्यात येणार आहे.

मागील वषी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार विकासनिधी राबविण्यात आला नसल्याने बैठक घेण्यास अर्थ, कर आणि महसूल स्थायी समिती अध्यक्षांना नकार दिला होता. मात्र, लेखा विभागाच्या अधिकाऱयांसह महापौरांच्या विनंतीनंतर अखेर   बैठक घेण्याची तयारी महसूल अध्यक्षांनी दर्शविली आहे. यामुळे तयार करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर शुक्रवारी चर्चा करून मंजुरी देण्यात येणार आहे. त्यानंतर लागलीच शनिवार दि. 23 रोजी सभागृहात अर्थसंकल्प मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विकासकामे राबविण्यासह महसूल वाढविण्यासाठी महापालिका प्रशासन कोणत्या तरतुदी अर्थसंकल्पात करणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.