|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोत फुटपाथवरून कोळसा प्रदुषणविरोधी मुकमोर्चा, काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपा विरोधी गटांचाही सहभाग

वास्कोत फुटपाथवरून कोळसा प्रदुषणविरोधी मुकमोर्चा, काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपा विरोधी गटांचाही सहभाग 

प्रतिनिधी /वास्को:

मुरगाव बंदरातील कोळसा प्रदुषणाविरोधात आयोजित करण्यात आलेल्या मुकमोर्चाला पोलिसांनी आक्षेप घेतल्याने हा मोर्चा फुटपाथवरून काढणे भाग पडले. काल गुरूवारी सकाळी मुरगाव सिटीझन्सच्या झेंडय़ाखाली वास्कोत हा मोर्चा काढण्यात आला.  काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीष चोडणकर, संकल्प आमोणकर, माजीमंत्री जुझे फिलिप डिसोजा, प्रतिमा कुतिन्हो, वरद म्हर्दोळकर यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

कोळसा प्रदुषणविरोधी या मुकमोर्चाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाविरोधकांचा पाठींबा लाभला होता. या नियोजित मोर्चाला उपजिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिली होती. परंतु केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्या आगमनामुळे या मोर्चाला शेवटच्या क्षणी पोलिसांनी आक्षेत घेतला. त्यामुळे रस्त्यावर न उतरता शहरातील स्वातंत्रपथ मार्गाच्या फुटपाथवरून मुरगाव पालिका इमारतीपर्यंत काढावा लागला. हा मुकमोर्चा अडवण्यासाठी वास्को शहरातील दामोदर मंदिराशेजारी सकाळीच पोलिसांनी कडे केले होते. त्यामुळे मोर्चेकऱयांमध्ये चलबिचल सुरू झाली. पोलिसांनी रस्त्यावरून चालण्यास आक्षेप घेतल्याने अखेर सर्व मोर्चेकऱयांनी फुटपाथवरून मोर्चा काढला. नागरिक फुटपाथवरून तर पोलीस त्यांच्या सोबतीने रस्त्यावरून चालत होते.

या मोर्चाची पालिका इमारतीसमोर सांगता करण्यात आली. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी महसुलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नझीर खान, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, भावना भोसले, माजी नगरसेविका शांती मांद्रेकर, गोंयच्या रापणकार एकवट संघटनेचे सरचिटणीस ओलान्सिओ सिमोईस, गोवा अगेन्स्ट कोलचे समन्वयक किस्तोद डिसोजा तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, युवा नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.