|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भारतीय संरक्षण उत्पादन उद्योगांनी जागतिक भरारी घ्यावी

भारतीय संरक्षण उत्पादन उद्योगांनी जागतिक भरारी घ्यावी 

प्रतिनिधी /वास्को :

देशातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन उद्योगांनी जागतिक स्तरावर भरारी घ्यावी. विकास, गुणवत्ता आणि स्पर्धेबरोबरच देश संरक्षण उत्पादनात आघाडीवर असायला हवा. देशातील सुरक्षा उत्पादन उद्योगांनी जागतिक पातळीवर ग्राहक निर्माण करण्याची क्षमता बाळगायला हवी, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी गुरुवारी गोवा शिपयार्डमध्ये आयोजित केलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सचेत’ गस्ती जहाजाच्या जलावतरण सोहळय़ात केले.

गोवा शिपयार्डच्या धक्क्यावर आयोजित केलेल्या या सोहळय़ाला केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक व पश्चिम कमांडचे प्रमुख के. नटराजन, कमोडोर मनोज बाडकर, नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी रिअर ऍडमिरल फिलिपोस जॉर्ज पायनुमुटील, एमपीटीचे अध्यक्ष ई. रमेशकुमार तसेच तटरक्षक दल, नौदल व गोवा शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

संरक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात देशातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सुरक्षा उत्पादन उद्योग, त्यांची गुणवत्ता, स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय मार्केटवर लक्ष्य केंद्रीत करण्याची आवश्यकता या गोष्टींवर भर दिला.

गोवा शिपयार्डकडे उत्तम गुणवत्ता

देशात खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सुरक्षा उद्योगांचा विकास व्हायलाच हवा. सुरक्षा उद्योग देशात वाढायला हवेत. त्यांच्यात गुणवत्ताही वाढायला हवी. त्यांच्यात स्पर्धा असावी. मात्र, या क्षेत्रात भारताच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून त्यांनी मार्गक्रमण करायला हवे. एकमेकांमधील सदृढ स्पर्धा विकासासाठी हव्या आहेत असे सांगून गोवा शिपयार्डच्या कार्यक्षमतेचे त्यांनी तोंडभरून कौतुक गेले. त्या म्हणाल्या की, गोवा शिपयार्ड देशातील एक उत्तम गुणवत्ता असलेले शिपयार्ड असून गोवा शिपयार्डने आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध केलेली आहे. देशातील खासगी क्षेत्रातील अत्याधुनिक शिपयार्डशीही गोवा शिपयार्ड स्पर्धा करीत आहे, याचीही त्यांनी नोंद घेतली.