|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंगणेवाडी यात्रोत्सवाची जय्यत तयारी

आंगणेवाडी यात्रोत्सवाची जय्यत तयारी 

दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:

  आंगणेवाडी येथील दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया श्री भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव 25 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यात्रोत्सव अगदी काही दिवसांवर आला असून आंगणेवाडी येथे चाकरमानी व व्यापारीवर्गाची लगबग वाढली आहे. आंगणे कुटुंबीय हे व्यापारी, भाविकांच्या स्वागतासाठी तसेच यात्रोत्सवाच्या तयारीमध्ये गुंतले आहेत. व्यापारी वर्ग दिवस-रात्र झटून आपली दुकाने थाटण्याच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहता गर्दीचा नवा विक्रम होण्याची शक्यता आंगणे ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यात्रोत्सवाचे संपूर्ण नियोजन आंगणे कुटुंबियांनी पूर्ण केले आहे.

यात्रोत्सवामध्ये केंद्रबिंदू असतो तो भाविक. या सर्व भाविकांना अवघ्या 15 ते 20 मिनिटांत दर्शन होण्यासाठी नऊ रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना लवकर व सुलभ दर्शन होणार आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंगांसाठी विशेष रांगांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व रांगा मंदिरामध्ये प्रवेश करताच त्या सर्व जलद चालण्यासाठी सुद्धा प्रयोजन आहे.

पाणी, वीजपुरवठय़ाचे योग्य नियोजन

आंगणेवाडीत पुन्हा एकदा पाणी शुद्धीकरण मोहीम नव्याने हाती घेण्यात आली असून भाविकांनाही पाण्याचा मुबलक पुरवठा करण्याचा प्रयत्न व नियोजन करण्यात आले आहे. पाण्याची समस्या भासू नये म्हणून टँकरनेही पाणीपुरवठा करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. वीज वितरणचे कर्मचारी वीज मिटर जोडणीसाठी अहोरात्र झटत आहेत.

यात्रोत्सवाला निवडणुकीची किनार

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची नेतेमंडळी उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदा गर्दीचा नवा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनानेही नियोजन केले आहे. मंडळाच्यावतीने सुमारे 35 ते 40 सीसीटिव्ही कॅमेऱयांनी गर्दीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यावर्षी अतिमहनीय रांगांमधील पासांची संख्या कमी केल्याने व्हीआयपी रांगांमध्ये गर्दी कमी दिसणार आहे.

आंगणेवाडी मंदिरासभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून यावर्षीही यात्रा कालावधीत ड्रोन कॅमेऱयाने यात्रेचे शूटिंग करण्यात येणार आहे. मंदिर व देवीचा गाभारा यामध्ये फुलांची आकर्षक सजावट यावर्षीही करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई येथील सुमारे 30 ते 40 कारागीर कार्यरत राहणार आहेत. डिजीटल बॅनर व संदेश देणारे एलईडी बल्ब बसविण्यास सुरुवात करण्यात आली असून यासाठी रोहन कॉम्पेक्ट व्हिजन मुंबईचे आनंद आंगणे, सहकारी शशिकांत आंगणे व सर्व सहकारी विशेष मेहनत घेत आहेत. यात्रा कालावधीत ज्वलनशील पदार्थ बाळगण्यास पोलीस प्रशासनाने बंदी घातली आहे. प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानात अग्नीशमन गॅस सोबत ठेवणे जरुरीचे आहे. प्रत्येक दुकानदाराने सुक्या व ओल्या कचऱयाची व्यवस्था करायची आहे. महसूल, पोलीस, आंगणे कुटुंबीय, बिळवस ग्रामपंचायत, आरोग्य व एसटी प्रशासनाच्यावतीने संपूर्ण नियोजन पूर्णत्वाकडे गेले आहे.

Related posts: