|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारत व दक्षिण कोरिया यांच्यात सहा करार

भारत व दक्षिण कोरिया यांच्यात सहा करार 

वृत्तसंस्था /सोल :

दक्षिण कोरिया आणि भारत यांच्यात सहा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये करार करण्यात आला आहे. त्यानुसार दक्षिण कोरिया भारतात पायाभूत सुविधा, जागतिक गुन्हेगारी विरोध, दहशतवाद विरोध, व्यापार आणि विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या या देशाच्या दौऱयावर असून त्यांच्या उपस्थितीतच हे करार करण्यात आले. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मूनजेई-इन यांच्याशी 2 तास द्विपक्षीय चर्चा केली. मोदी यांच्याबरोबर भारताचे राजकीय व व्यापारी शिष्टमंडळही आहे.

या करारांच्या अंतर्गत दक्षिण कोरिया भारतामध्ये रेल्वे, महामार्ग बांधणी, बंदर विकास व विमानतळ प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणार आहे. तसेच दोन्ही देशांमधील व्यापार आणि परस्पर सहकार्य वृद्धींगत व्हावे यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

गेल्या साडेचार वर्षात मोदींनी भारताचे ‘पूर्वेकडे पहा’ हे धोरण वेगाने पुढे चालविले आहे. त्याअंतर्गत भारताच्या पूर्वेला असणारे देश अर्थात जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर इत्यादी देशांबरोबर व्यापारी संबंध दृढ करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. तसेच या देशांनी भारतात गुंतवणूक करावी यासाठीही अनेक कार्यक्रम घोषित करण्यात आले आहेत.

या देशाबरोबर झालेल्या 6 करारांची माहिती भारताच्या विदेश व्यवहार विभागाचे मुख्य प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली. दक्षिण कोरियाचा मुख्य पोलीस विभाग आणि भारताचे गृहमंत्रालय यांच्यातही आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी व दहशतवाद रोखण्यासाठी सहकार्याचा करार करण्यात आला. त्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हे करणाऱया टोळ्य़ा व व्यक्ती यांची माहिती एकमेकांना देणे तसेच अशा गुन्हेगारांना थारा न देणे यासंबंधी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या.

दक्षिण कोरियातील महत्त्वाची ऐतिहासिक व्यक्तीरेखा महारानी हूरवांग-ओके यांच्या स्मरणार्थ भारत आणि कोरिया यांनी काढलेल्या संयुक्त पोस्ट तिकीटाचे अनावरणही मोदी व मून यांच्या हस्ते करण्यात आले. वांग या भारतातील आयोध्येच्या राजकन्या होत्या. दोन हजार वर्षापूर्वी त्यांचा विवाह दक्षिण कोरियातील राज घराण्यात झाला होता. तेंव्हापासून या देशाशी भारताचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. आजही लक्षावधी कोरियन नागरिक आपण या राणीचे वंशज असल्याचे अबिमानाने सांगतात.

कोरिया प्लसशी सहकार्य

तिसऱया करारांतर्गत दक्षिण कोरियाच्या कोरिया प्लस या वित्तीय कंपनीशी गुंतवणूक विषयक सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. ही कंपनी भारतात गुंतवणूक करणार आहे. त्यानुसार कोरियन कंपन्या भारतात विविध क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत. कोरिया प्लस ही कंपनी जून 2016 मध्ये स्थापन करण्यात आली होती. यात या देशातील  उद्योग, व्यापार आणि ऊर्जा संस्थांचा सहभाग आहे.

Related posts: