|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिलांची विजयी सलामी

भारतीय महिलांची विजयी सलामी 

मुंबई / वृत्तसंस्था :

फिरकीपटू एकता बिश्तने अवघ्या 25 धावांमध्येच 4 बळी घेतल्यानंतर यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने येथील पहिल्या वनडेत इंग्लिश महिला संघाचा 66 धावांनी धुव्वा उडवला. प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव 49.4 षटकात 202 धावांवरच आटोपला. पण, प्रत्युत्तरात इंग्लंडची चांगलीच दाणादाण उडाली आणि त्यांना 41 षटकात सर्वबाद 136 धावांवरच समाधान मानावे लागले. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. एकताला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला.

विजयासाठी 203 धावांचे आव्हान असताना जोन्स (1), बीमाऊंट (18) व सारा टेलर (10) या आघाडीच्या तीन फलंदाज अतिशय स्वस्तात बाद झाल्या आणि यानंतर इंग्लिश महिला संघाला त्यातून फारसे सावरताच आले नाही. मध्यमगती गोलंदाज शिखा पांडेला येथे चांगला स्विंग मिळाला आणि यामुळे तिने ऍमी जोन्स, सारा टेलर यांना सहज तंबूत धाडले. दीप्ती शर्माने टॅमी बीमाऊंटला बाद केले.

सर्वाधिक 44 धावा जमवणारी नताली स्कीव्हर व कर्णधार हीदर नाईट (2 चौकारांसह नाबाद 39) यांनी चौथ्या गडय़ासाठी 73 धावांची भागीदारी साकारली. यामुळे, 3 बाद 38 या बिकट धावसंख्येतून इंग्लिश संघाला थोडेफार सावरता आले. स्कीव्हरने अधिक आक्रमक पवित्र्यावर भर दिला. स्वीप फटक्यांवर भर देत तिने भारतीय फिरकी गोलंदाजी निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला आणि यात बऱयापैकी यशही मिळवले. पण, पुढे ती नॉन स्ट्रायकर एण्डवर असताना धावचीत होत परतली आणि इंग्लंडसाठी हा मोठा धक्का ठरला.

त्यानंतर पुढील षटकातच डॅनिएले वॅटने दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर बिश्तकडे झेल दिला आणि तळाचे फलंदाजी फारशी भर घालू शकले नाहीत. इंग्लिश कर्णधार हीदर नाईट 64 चेंडूत 2 चौकारांसह 39 धावांवर नाबाद राहिली. दुसऱया बाजूने सहकारी फलंदाज ठरावीक अंतराने परतत राहिल्याने तिच्या प्रयत्नांवर बऱयाच मर्यादा राहिल्या.

भारताची आक्रमक सुरुवात

प्रारंभी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने टी-20 क्रिकेटमधील बहारदार फॉर्म वनडे क्रिकेटमध्येही कायम राखला. जेमिमा रॉड्रिग्ज (58 चेंडूत 48) व स्मृती मानधना (42 चेंडूत 24) यांनी 15.1 षटकात 69 धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर संघाची अचानक तारांबळ उडणे आश्चर्याचे ठरले. रॉड्रिग्जच्या खेळीत 8 चौकार तर स्मृतीच्या खेळीत 3 चौकारांचा समावेश राहिला. पण, नंतर भारताने अवघ्या 26 धावांमध्येच 5 फलंदाज गमावले आणि यामुळे अचानक संघाची स्थिती 5 बाद 95 अशी झाली. अनुभवी मिताली राजने (74 चेंडूत 44) तानिया भाटियाच्या साथीने 54 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. अनुभवी झुलन गोस्वामीने देखील 3 चौकार व एका षटकारासह 37 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. तिच्या या छोटेखानी खेळीमुळेच भारताला 200 धावांचा टप्पा सर करता आला होता.

संक्षिप्त धावफलक

भारतीय महिला : 49.4 षटकात सर्वबाद 202. (जेमिमा रॉड्रिग्ज 58 चेंडूत 8 चौकारांसह 48, मिताली राज 74 चेंडूत 4 चौकारांसह 44, तानिया भाटिया 41 चेंडूत 2 चौकारांसह 25, झुलन गोस्वामी 37 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 30, शिखा पांडे 11. अवांतर 11. एक्लेस्टोन 2-27, स्कीव्हर 2-29, एल्विस 2-45, श्रबसोल 1-40).

इंग्लिश महिला : 41 षटकात सर्वबाद 136. (स्कीव्हर 66 चेंडूत 5 चौकारांसह 44, हिदर नाईट 64 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 39, बीमाऊंट 2 चौकारांसह 18. अवांतर 10. एकता बिश्त 8 षटकात 25 धावात 4 बळी, दीप्ती शर्मा 2-32, शिखा पांडे 2-21, झुलन गोस्वामी 1-21).

Related posts: