|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय!

कुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय! 

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था :

कुंभपर्वात सामील झालेल्या विदेशी नागरिक तसेच प्रतिनिधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संबोधित केले. कुंभमध्ये दररोज युरोपच्या एखाद्या देशाच्या लोकसंख्येइतके लोक सहभागी होतात. कुंभचा इतिहास आणि त्याच्या आयोजनावर व्यवस्थापनाचे विद्यार्थी अभ्यास करू शकतात, सर्वांना सामावून घेणारी, सर्वांना संतुष्ट करणारी तसेच सर्वांचे व्यवस्थापन करणारी ही  व्यवस्था असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

जगभरातील भाविकांची भेट

कोणत्याही पत्र-निमंत्रणाशिवाय हजारो वर्षांपासून गंगा मातेच्या दर्शनासाठी देशविदेशातील भाविक पोहोचतात. यंदाचा हा अर्धकुंभ आहे, पूर्ण कुंभाचे आयोजन जेव्हा होईल, तेव्हा त्याच्या शक्तीचा अंदाज यातून घेतला जाऊ शकतो. या सोहळय़ाचे आध्यात्मिक महत्त्व असण्यासोबतच सामाजिक पुनर्रचनेत देखील महत्त्व आहे. एकप्रकारे ही पुरातन काळापासून चालत आलेली पंचायत आहे. यात दर 12 वर्षांचा आढावा घेत समाजात कशाप्रकारच्या सुधारणांची गरज आवश्यक आहे हे निश्चित केले जात असल्याचे मोदी म्हणाले.

शांततेच्या शोधात

दर तीन वर्षांनी त्याचा आढावा घेतला जातो. यंदाच्या कुंभमध्ये सर्वसामान्यांच्या भल्यासाठी संदेश होता. जगाला शांततेचा शोध असल्यानेच भारत पर्यटनाचे मुख्य केंद्र ठरत आहे. जीवनाच्या धावपळीतून व्यक्ती स्वतःसाठी काही वेळ घालवू इच्छितो. धन-वैभव समृद्धी त्याला प्रभावित करत असली तरीही प्रेरित करू शकत नाही. भौतिक संपदेची कमतरता असूनही अंतर्मनाचा कसा शोध घेतला जातो याची अनुभूती कुंभमध्ये होते असे मोदी म्हणाले.

महान वारसा

हा अद्भूत मिलनाचा कार्यक्रम जगभरातील लोकांनी अनुभवला आहे. आमच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी विदेशी प्रतिनिधींनी देखील योगदान दिले आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशात जगाला आकर्षित करण्याचे अद्भूत सामर्थ्य आहे. आम्ही जगाला भारताच्या या महान वारशाशी जोडू इच्छित असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

पाकचे खासदार कुंभमध्ये

पुलवामा हल्ल्यानंतर शेजारी देशासोबत तणाव वाढलेला असूनही पाकिस्तानचे खासदार रमेश कुमार बंकवानी यांनी कुंभमेळय़ाचा दौरा केला आहे. त्यांनी कुंभच्या शानदार आयोजनासाठी केंद्र तसेच राज्य सरकारचे कौतुक केले आहे. मी अनेकदा प्रयागराजला आलो आहे, परंतु यंदाचे आयोजन अत्यंत प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले.

लक्ष्मण यांच्याकडून पवित्र स्नान

तीर्थनगरी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभपर्वात भारताचे माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हजेरी लावत संगमक्षेत्री पवित्र स्नान केले. ते कुटुंबीयांसह प्रयागराज येथे आले आहेत. लक्ष्मण यांच्यापूर्वी बीसीसीआयचे माजी पदाधिकारी राजीव शुक्ला यांनीही कुंभपर्वात भाग घेतला.

 

Related posts: