|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज 

विशाखापट्टणम / वृत्तसंस्था

इंग्लंडमध्ये होणाऱया आयसीसी विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ आजपासून (दि. 24) ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत स्वतःचा फॉर्म पुन्हा एकदा आजमावून पाहील, शिवाय, वर्ल्डकपसाठी ज्या दोन-एक जागांवर अद्याप खेळाडू निश्चित झालेले नाहीत, त्यासाठीही अंतिम निवडीवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करेल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे आज पहिली टी-20 होत असून उभय संघ येथे एकूण 2 टी-20 व 5 वनडे सामन्यासाठी आमनेसामने उभे ठाकत आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार, आजच्या लढतीला सायंकाळी 7 वाजता सुरुवात होईल.

सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ बराच झगडत असून त्या पार्श्वभूमीवर वर्ल्डकपच्या तयारीवर शेवटच्या हात फिरवणे, हेच भारताचे मुख्य लक्ष्य असणार आहे. प्रत्यक्ष वनडे मालिकेपूर्वी दोन टी-20 होत असून त्यात वर्ल्डकप संघातील उर्वरित दोन जागांसाठी जे प्रबळ दावेदार आहेत, त्यांच्यातच प्रामुख्याने चुरस रंगणे अपेक्षित आहे. कर्णधार विराट कोहली तीन आठवडय़ांच्या उत्तम विश्रांतीनंतर संघात परतत असून ऋषभ पंत व विजय शंकर यांच्यावर त्याचे प्रामुख्याने लक्ष असेल. वनडे संघात दिनेश कार्तिकला पिछाडीवर टाकत ऋषभ पंत सरस ठरला असला तरी येथे त्याला स्वतःचा फॉर्म आणि उपयुक्तता प्रत्यक्षात सिद्ध करावी लागेल. तसे झाले तरच त्याला विश्वचषकासाठी निश्चितपणाने संधी मिळेल.

विजय शंकरसाठी ही अर्थातच मोठी संधी आहे. हार्दिक पंडय़ा दुखापतीमुळे बाहेर फेकला गेल्याने विजय शंकरला संघात पाचारण केले गेले आहे. फलंदाजीत तो स्फोटक ठरु शकतो, हे काही वेळा दिसून आले आहे. मात्र, गोलंदाजीतही आपण उपयुक्त ठरु शकतो, हे त्याला दाखवून द्यावे लागेल. तामिळनाडूच्या अनुभवी दिनेश कार्तिकला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे संघातून वगळला गेले असल्याने त्याच्यासाठी विश्वचषकापूर्वी ही शेवटचीच संधी असेल. न्यूझीलंडविरुद्ध कृणाल पंडय़ा नॉन स्ट्रायकर एण्डवर असताना एकेरी धाव नाकारत दिनेश कार्तिकने बरीच नाराजी ओढवून घेतली आहे. ती लढत भारताला 4 धावांनी गमवावी लागल्याने त्याचा कार्तिकला अधिक फटका सोसावा लागला होता.

जसप्रीतचे पुनरागमन

सध्याच्या घडीचा अव्वल जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतला असल्याने गोलंदाजी अर्थातच पूर्वीप्रमाणे भक्कम झाली आहे. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेदरम्यान संघाला त्याची उणीव प्रकर्षाने जाणवली होती. बुमराहला टी-20 क्रिकेटमध्ये 50 बळींचा माईलस्टोन गाठण्यासाठी आता केवळ दोनच फलंदाज बाद करण्याची आवश्यकता असून असे केल्यास तो अश्विननंतरचा केवळ दुसराच गोलंदाज असेल. अर्थात, टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीत फारसे सातत्य राहिलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. न्यूझीलंडविरुद्ध अलीकडेच 1-2 अशा फरकाने टी-20 मालिका गमावली, हे त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका शेवटची रंगीत तालीम असेलही. पण, विराट या माध्यमातून शेवटच्या दोन जागा निश्चित करण्यावरच मुख्य लक्ष केंद्रित करुन असणार आहे.

बहारदार फॉर्मसाठी कोहली महत्त्वाकांक्षी

कोहली 2018 मधील बहारदार फॉर्मची येथे पुनरावृत्ती करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. मागील वर्षात त्याने विविध क्रिकेट प्रकारातील 38 सामन्यात 2735 धावांची आतषबाजी केली. वनडेमध्ये 14 डावात 133.55 च्या धमाकेदार सरासरीसह त्याने 1202 धावा चोपल्या होत्या. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 टी-20 सामन्यात 61 ची दमदार सरासरी नोंदवली असून येथेही तो कांगारुंसाठी नव्याने आव्हान प्रस्थापित करेल, हे साहजिकच आहे.

ऍरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच तीन महिन्यांपूर्वी खेळलेल्या मालिकेनंतर एकही आंतरराष्ट्रीय टी-20 खेळलेली नाही. पण, त्यांच्या संघातील 6 खेळाडू अलीकडेच संपन्न झालेल्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळलेले आहेत. त्या लीगमध्ये मालिकावीर ठरलेल्या डॅर्सी शॉर्टने तेथे 15 सामन्यात होबार्ट हॅरिकेनतर्फे 53.08 च्या सरासरीने 637 धावांची आतषबाजी केली आहे. त्याशिवाय, केन रिचर्डसनने एकूण 24 बळी घेतले आहेत. डावखुरा सलामीवीर शॉर्ट आपल्या तंत्रात किंचीत बदल करत कारकिर्दीलाही नव्याने संजीवनी देण्यासाठी येथे प्रयत्नशील असणार आहे.

Related posts: