|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड

ड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड 

प्रतिनिधी /पणजी :

मांद्रे-नानोसवाडा येथे पेडणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ड्रग्ज व्यवसायात गुंतलेल्या तसेच अनेक ठिकाणी बँकांचे एटीएम फोडून पैसे लंपास करणाऱया एका विदेशी टोळीला गजाआड करण्यात यश आले आहे. चार रशियन नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे सात लाख रुपये किंमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. तसेच एटीएम फोडण्यासाठी वापरात आणलेली हत्यारेही जप्त केली आहेत.

काल पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनी ही माहिती दिली. त्यांच्या सोबत उपअधीक्षक (एसडीपेओ म्हापसा) सेराफिन डायस व पेडणेचे निरीक्षक संदेश चोडणकर उपस्थित होते.

शुक्रवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये इलाय एलेक्ससांद्रोव्हिच शेतन्नीको (30), रादीक वाफिनी (35), इवेजेन्नी झाखारीन (38) व इगोर मार्को (32) यांचा समावेश आहे. त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

घरातच केली होती गांजाची लागवड

मांद्रे नानोसवाडा येथे ड्रग्ज व्यवसाय होत असल्याची माहिती मिळताच कारवाई करून इलाय शेतन्नीको याला अटक केली. नानोसवाड येथे आपण राहात असलेल्या भाडय़ाच्या घरातच एका खोलीत कुंडीमध्ये गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे पोलिसांना आढळून आले. जबानीवेळी त्याने आपल्या अन्य साथिदारांची माहिती त्याने दिली. त्यानुसार सापळा रचून त्यांनाही अटक करण्यात आली. सर्वांकडून एकूण 7 लाख रुपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. त्याशिवाय जीए-03-डब्लू-5666 क्रमांकाची स्विफ्ट कार, एक एफजी दुचाकी तसेच दोन बनावट नंबरप्लेट जप्त केल्या आहेत.

हरमल येथील बँक ऑफ इंडियाचा एटीएम फोडला

संशयितांची सखोल उलट तपासणी करण्यात आली तेव्हा ते बँकांची एटीएम फोडण्याच्या प्रकारातही गुंतल्याचे उघड झाले. हरमल येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून त्यांनी 9 लाख रुपये लंपास केले होते, अशी माहिती त्यांनी दिली. जप्त केलेल्या कारमधून मुखवटे, हातमोजे, गॅस सिलिंडर, बॅटरी, गॅस कटर, तसेच स्फोट करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Related posts: