|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…

मध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत… 

प्रतिनिधी /बेळगाव :

शहर व उपनगरांमध्ये चोऱया, घरफोडय़ा, लुटमारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्री मोटारसायकलवरुन आलेल्या एका त्रिकुटाने शहरात अक्षरशः धुडगूस घातला. वाहनांवर दगडफेक करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही झाला. लुटमारी करताना हे त्रिकुट पोलिसांच्या जाळय़ात अडकले.

शुक्रवारी रात्री 11.30 पासून मध्यरात्री 12.30 पर्यंत या टोळीचा धुमाकूळ सुरू होता. पोलिसांनी पाठलाग करुनही त्यांना चकवून ही टोळी सुसाटवेगाने मोटारसायकलवरुन शहरात धुडगूस घालत सुटली होती. अखेर मध्यरात्री अशोकनगर परिसरातील एका युवकावर दगडफेक करुन त्याचे पाकिट तसेच मोबाईलही त्यांनी हिसकावून घेतला.

महेश सिद्धराम सुंकद (वय 20), विवेक कऱयाप्पा नाईक (वय 23), कार्तिक जोतिबा पाटील (वय 19, तिघेही रा. कंग्राळी बुद्रुक) अशी त्यांची नावे आहेत. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी या त्रिकुटाला अटक केली. शनिवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अशोकनगर येथील ईएसआय वसतीगृहातील रजाक हसनसाब लाडखान (वय 37) हा युवक आपल्या केए 22 डब्ल्यू 6474 क्रमांकाच्या मोटारसायकलीवरुन रात्रीचे काम आटोपून घरी जात होता. त्यावेळी या त्रिकुटाने रजाकला अडविले. आमच्या गाडीतील पेट्रोल संपले आहे, जरा मोबाईल द्या, घरी संपर्क साधून पेट्रोल मागवितो, असे सांगत रजाककडून मोबाईल मागून घेतला.

कोणाला तरी कॉल लावून ते खूपवेळ बोलत होते. त्यावेळी कंटाळलेल्या रजाकने पेट्रोल संपले असेल तर माझ्या गाडीतील पेट्रोल देतो, मला घरी जायला उशीर होतोय, मोबाईल परत द्या, अशी मागणी केली. त्यावेळी त्रिकुटाने रजाकवर दगडफेक करुन त्याचा मोबाईल व पाकिटही काढून घेतले. पाकिटमध्ये वाहन  परवाना, एटीएम कार्ड व रोख रक्कम होती. ही घटना घडण्याआधीपासून पोलीस या त्रिकुटाला शोधत होते. शुक्रवारी रात्री गस्तीवर असलेले मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, रहदारी दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक टी. एच. करीकल आदी अधिकारी धुडगूस घालणाऱया त्रिकुटाला पकडण्यासाठी प्रयत्न करीत होते. लुटमारीच्या घटनेनंतर 24 तासात या त्रिकुटाला अटक करुन 45 हजारांचा ऐवज व दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

Related posts: