|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई..!

एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई..! 

जयघोष भराडी मातेचा, आंगणेवाडी दुमदुमली ः चोख नियोजनाने भाविक सुखावले

सुमारे दहा लाख भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज मंत्री, खासदार, आमदार, राजकीय नेत्यांची गर्दी

दत्तप्रसाद पेडणेकर / आंगणेवाडी:

 ‘मुखदर्शन द्यावे आता, तू सकल जनांची माता’च्या जयघोषात लाखो भाविक आंगणेवाडीतील देवी भराडी मातेच्या चरणी सोमवारी नतमस्तक झाले. दहा रांगांमुळे अतिशय शिस्तबद्ध नियोजन होऊन भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले. पहाटे तीनपासून मंगलमय वातावरणात भराडी मातेच्या दर्शनास प्रारंभ झाला. भाविक मध्यरात्रीच आंगणेवाडीत दाखल झाले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी होती. आज आठ ते दहा लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. बारावीच्या परीक्षांमुळे आंगणेवाडीत सकाळच्या सत्रात काहीशी गर्दी कमी  दिसत होती. मात्र, दुपारनंतर गर्दीने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली.

 केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सौ. उमा प्रभू, शालेय शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, बंदरराज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे, स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे, खासदार विनायक राऊत, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, माजी आमदार विजय सावंत, अभिनेते अरुण कदम, संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार आशिष शेलार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार शिवराम दळवी, दत्ताजी दळवी, आमदार नरेंद्र पवार, संदेश पारकर, राजन तेली, परशुराम उपरकर, बाळा नांदगावकर, मुंबईचे महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर, अखिल भारतीय कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, दीपक सावंत आदींनी भराडी मातेचे दर्शन घेतले.

दहा रांगांद्वारे गर्दीवर नियंत्रण

 आंगणेवाडी यात्रा आणि भाविकांची गर्दी हे समीकरण जणू गेली काही वर्षे रुढ झाले आहे. गर्दीचे सुयोग्य नियोजन ही तर आंगणेवाडी यात्रेची खासियत. दरवर्षी गर्दीचा अनोखा उच्चांक होत असून नियोजनातही सातत्याने बदल केला जातोय. यंदा दहा रांगांद्वारे गर्दीची विभागणी करण्यात आली. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. त्यामुळे भाविकांना पंधरा ते वीस मिनिटांत भराडी देवीचे दर्शन होणार, हा आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचा दावा खरा ठरला. पहाटे तीनपासूनच मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. मंदिर परिसरात आकर्षक मंडप उभारण्यात आल्याने धुरळय़ाचा त्रास नव्हता. अत्यंत प्रफुल्लित वातावरणात भाविकांना ‘याची देही याची डोळा’ मातेचे रुप डोळय़ांमध्ये साठवता आले.

खारदांडा येथून भाविक आले पायी

 मुंबई-खारदांडा येथील ओम साई पदयात्रा सेवा मंडळाचे भाविक पदयात्रेद्वारे भराडी मातेच्या दर्शनासाठी निघाले होते. आज त्यांचे आंगणेवाडीत आगमन झाले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने त्यांचे स्वागत केले. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघातर्फे 501 नारळांचा प्रसाद मातेच्या चरणी अर्पण करण्यात आला. तुलाभारासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. नारळ, गूळ, साखर आदी वस्तूंद्वारे तुला सुरू होत्या. पहाटेपासून सुरू झालेला भाविकांचा ओघ रात्री उशिरापर्यंत कायम होता. कणकवली व मालवण या दोन्ही ठिकाणी साधारण एक किमी लांब रांगा उशिरापर्यंत होत्या. मात्र, या रांगा सुनियोजित व्यवस्थापनामुळे फार काळ लांबल्या नाहीत, हे वैशिष्टय़ ठरले. सजलेली दुकाने, वाहनांची वर्दळ, भाविकांचा अमाप उत्साह, यात्रा यशस्वीतेसाठी राबणारी प्रशासकीय यंत्रणा, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ व आंगणे कुटुंबीय यांचा वावर अशा भारलेल्या वातावरणाने संपूर्ण आंगणेवाडी परिसर आनंदून गेला होता. तुलाभारासह अन्य नवस फेडण्यासाठी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते. जिल्हा आरोग्य विभाग, मालवण पंचायत समिती व मसुरे ग्रामपंचायतीतर्फे शासकीय योजनांची माहिती देण्यात येत होती. तालुका विधी सेवा समितीतर्फेही न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देण्यात येत होती. ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते.

राजकीय पक्षांचे असेही योगदान

 यात्रेमध्ये राजकीय पक्षांनीही योगदान दिले. शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक अरुण दूधवडकर यांनी मोफत सरबताचे वाटप केले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप करण्यात आले. आप्पाजी आंगणे मित्रमंडळ आणि शिवसेनेतर्फे सरबत वाटप करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्यातून आयोजित राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडारसिकांची गर्दी झाली होती. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. तसेच मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शनही याठिकाणी भरविण्यात आले होते.

Related posts: