|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनपाचा 8लाख 73 हजाराचा शिलकी अर्थसंकल्प

मनपाचा 8लाख 73 हजाराचा शिलकी अर्थसंकल्प 

प्रतिनिधी /बेळगाव :

महापालिकेचा अर्थसंकल्पात बहुतांश जुन्याच तरतूदी करण्यात आल्या असून केवळ आकडेवारीत बदल झाला आहे. यामुळे मनपाचा अर्थसंकल्प मागील पानावरून पुढे असा प्रकार आहे. महापालिकेला 312 कोटी 43 लाख 25 हजार रूपये महसुल मिळणार असून 312 कोटी 34 लाख 53 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे 8 लाख 73 हजार शिल्लकी अर्थसंकल्प आहे. पण यामध्ये दिव्यांगासाठी सिध्दगंगा मठाचे महास्वामीजी शिवकुमार स्वामीजीच्या नांवे शिष्यवृत्ती सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

       जमेची बाजू

-मालमत्ता कर वसुलीकरीता विशेष मोहिम राबविण्यात येत असून मालमत्ताचे पुनर्रसर्वेक्षण करण्यात येत आहे. यामुळे स्वयंघोािषत कर आकारणी आणि  दंडात्मक कारवाईसह कर वसूल करून महसूल वाढविण्यात येणार आहे.

– सर्व मालमत्तांची नोंद ऑनलाईन करण्यात आली असून 19-20 अर्थिक वर्षात  43 कोटीचा मालमत्ता कर वसुल करण्याचे उद्दिष्ट.

–  फेरीवाले व भाजी विपेत्याकडून वसुल करण्यात येणाऱया भूभाडय़ाच्या माध्यमातून मनपाला मिळणार 60 लाख.

– इमारत बांधकाम परवागी देताना आकारण्यात येणाऱया डेव्हलोपमेंट फीच्या माध्यमातून 6 कोटी आणि पायाभूत सुविधा कराच्या माध्यमातून 30 लाख, ,झोपडपट्टी  सेस 10 लाख आणि विद्युत वाहिन्या  घालण्यासाठी परवानगी देताना आकारण्यात येणाऱया रस्ता खोदाईच्या माध्यमातून 17  कोटी आणि गॅस वाहिनी घालण्यासाठी आकारण्यात येणाऱया रस्ता खोदाई शुल्काच्या माध्यमातून 2 कोटी महसूल मिळण्याची शक्यता आहे.

– विविध उद्योगधद्यांना पुरविण्यात येणाऱया पाणी पुरवठयाच्या माध्यमातून 31 कोटी 14 लाख महसूल मिळण्याची शक्यता आहे.

-व्यवसाय परवाना फी च्या माध्यमातून  1कोटी 25 लाख, पार्किंग फी आकारण्याचा प्रस्ताव असल्याने 15 लाख रूपये निधी महापालिका मिळण्याची शक्यता आहे.