|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जिल्हय़ात 287 शिक्षक पदे भरणार

जिल्हय़ात 287 शिक्षक पदे भरणार 

आठ वर्षांनंतर भरती : प्रक्रिया सुरु, शिक्षणाधिकाऱयांची माहिती

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

शासनाने 2010 मध्ये शिक्षक भरती केल्यानंतर आता आठ वर्षांनी शिक्षक भरतीस मान्यता दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात 287 प्राथमिक शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून एक-दोन दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती जि. प. चे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी जि. प. शिक्षण समितीच्या सभेत दिली.

ही सभा सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै समिती सभागृहामध्ये झाली. यावेळी समिती सदस्या सरोज परब, उन्नती धुरी, संपदा देसाई, विष्णूदास कुबल, राजन मुळीक, समिती सचिव तथा शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, गटशिक्षणाधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.

पाचवी ते आठवीसाठी शिक्षक भरती

आंबोकर यांनी शिक्षक भरतीबाबत माहिती देताना सांगितले, शासनाने 2010 मध्ये शिक्षक भरती केली. त्यानंतर शिक्षक भरती केली नाही. भरतीवर बंदी होती. आता शासनाने शिक्षक भरतीचा निर्णय घेतला आहे. राज्यात 10 हजार शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. शासनाच्या पवित्र पोर्टलवर भरतीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिंधुदुर्गात पाचवी ते आठवीच्या वर्गासाठी 287 शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.

रिक्त पदे गृहित धरूनच भरती

मुख्याध्यापकांचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. परंतु मुख्याध्यापकांना उपशिक्षक पदावर सामावून घेतले जाणार आहे. त्यामुळे पहिली ते चौथीच्या वर्गासाठी शिक्षक भरती नाही. मात्र पुढील वर्गासाठी 287 शिक्षक पदे भरली जाणार आहेत. काही शिक्षक आंतर जिल्हा बदलीने जाणार आहेत. त्यामुळे आंतर जिल्हा बदलीने रिक्त होणारी पदे गृहित धरूनच 287 रिक्त पदे दाखवून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

16 मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा

तीव्र उन्हाळय़ामुळे 1 मार्चपासूनच प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात करावी, अशी मागणी शिक्षक संघटनानी केली होती. मात्र कोकणात विदर्भ मराठवाडय़ाप्रमाणे तीव्र उन्हाळा नाही, असे स्पष्ट करीत 1 मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याची शिक्षक संघटनांची मागणी शिक्षण समितीने फेटाळून लावली. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे 16 मार्चपासून जि. प. च्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात सकाळी 7.20 ते 11.30 या वेळेत भरणार असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱयांनी दिली.

मुलेही नाहीत, शिक्षकही नाहीत

 1 मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याची मागणी फेटाळून लावत असतानाच मुले अजूनही सकाळी लवकर शाळेत येण्यास बघत नाहीत, असे शिक्षणाधिकाऱयांनी स्पष्ट केले. शनिवारी सकाळच्या शाळा भरत असल्याने आपण काही शाळांना भेटी दिल्या असता मुलेही आली नव्हती आणि शिक्षकही आले नव्हते, असा प्रकार पाहायला मिळाला. आता सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्यावर हे चालणार नाही. वेळेत शाळेत न येणाऱया शिक्षकांवर कारवाई करणार असल्याचे शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी सभागृहामध्ये सांगितले.

तीन गटशिक्षणाधिकाऱयांना नोटिसा

शिक्षण समितीच्या सभेला कुडाळ, कणकवली आणि दोडामार्ग तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनुपस्थित होते, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले असता अनुपस्थित राहण्याबाबत आपली परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे तीनही तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱयांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावणार, अशी माहिती शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी दिली.

 जीर्ण झालेल्या शाळा निर्लेखित करून आवश्यकतेनुसार शाळा बांधकामांचे प्रस्ताव तात्काळ पाठविण्याचे आदेश सभापतींनी दिले. तर जि. प. शाळांमधून गणित सुधार कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सभागृहामध्ये देण्यात आली.