|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » माढय़ातून शरद पवारांची माघार

माढय़ातून शरद पवारांची माघार 

मावळातून नातू पार्थ पवारला संधी : पवारांचा ‘यू टर्न’

 पुणे / प्रतिनिधी

माढय़ातून माझी उमेदवारी जाहीर झालेली नाही. आम्ही कुटुंबात बसून चर्चा केली असून, मी स्वत: उभे न राहता नव्या पिढीला संधी द्यायचे निश्चित केले आहे. त्यानुसार मावळमधून पार्थ पवार यास रिंगणात उतरवणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मोहिते-पाटील समर्थकांचा दबाव, भाजपच्या बाजूने झुकलेले वातावरण की नातवाला संधी देण्यासाठी पवार यांनी माढय़ातून माघार घेतली, हे अद्याप गुलदस्त्यातच असून, यामाध्यमातून पवार यांचे राजकीय धक्कातंत्र पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहे.

 माढय़ातून विजयसिंह मोहिते-पाटील यांना डावलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या पार्श्वभूमीवर माढय़ातील उमेदवारीवरून बारामती हॉस्टेल येथे आज पुन्हा खल झाला. राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, शेकाप नेते गणपतराव देशमुख, माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, सोलापूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, आमदार भारत भालके, कल्याण काळे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख या बैठकीला उपस्थित होते.

पवार म्हणाले, माढा मतदारसंघात स्थानिक नेत्यांमध्ये मतभिन्नता होती. त्यामुळे त्या सर्वांना बोलावून त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांच्याकडून सूचना घेतल्या. मी आत्तापर्यंत 14 वेळा निवडणूक लढविली असून, कधीही अपयश न पाहिलेला उमेदवार आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्याची चिंता मला वाटत नाही. 14 निवडणुकीत कोणत्याही प्रकारची चिंता वाटली नाही, तर ती आता का वाटेल? मागील निवडणुकीत मोदी लाट होती. मात्र, यंदा अशाप्रकारची कोणती लाट दिसून येत नाही. उलट अनुकूल वातावरण दिसत आहे. मी माढय़ामधून निवडणूक लढवावी, असा सहकाऱयांचा आग्रह आहे. पण माझी उमेदवारी जाहीर झालेली नाही.

आमची यादी तयार, काँग्रेसची वाट पाहतोय…

पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार आहेत. तसेच स्वाभिमानी पक्ष, सीपीएम या पक्षांशी बोलणी सुरू आहे. एक-दोन ठिकाणी जागा अदलाबदल करण्याच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे निर्णय होईल. स्वाभिमानीशी आमची अंतिम बोलणी झाली आहेत. काँग्रेससोबत त्यांचा निर्णय पक्का व्हायचा आहे. दोन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एकत्रित बसून उमेदवारी अंतिम करून त्याप्रकारे जाहीर भूमिका मांडतील. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी तयार असून काँग्रेसच्या यादीची आम्ही वाट पाहत आहोत. माझ्याकडे मतदारसंघातील कटुता टाळण्यासाठी लक्ष घालण्याची जबाबदारी असून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतही बैठक पार पडली आहे. चार टप्प्यातील निवडणुकीचा आम्हाला लाभ होईल.

 पंतप्रधानपदाच्या चर्चेला पूर्णविराम

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडीत येण्याच्या दृष्टीने मी कोणतीही चर्चा केलेली नसून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे त्यांच्यासोबत बोलणे झालेले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आघाडीत यावे, असे मी कधी सांगितलेले नसून त्यांची भूमिका राष्ट्रहिताची आहे. राज ठाकरेंवर ‘बारामतीचा पोपट’ अशी टीका केली जात असल्याकडे लक्ष वेधले असता मी पढवले ठीक आहे. बारामतीची ती परंपराच आहे, मोरोपंत बारामतीचे होते, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. देशाचे नेतृत्व करण्यासाठी अनुभवी खासदार हवा, हे खरे असले तरी संसदेत त्याकरिता स्वपक्षीय खासदारांची मोठी संख्या लागते. आम्ही संपूर्ण देशात 25-30 मतदारसंघात लढत आहोत, असे सांगत त्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

विखेंचा पराभव आम्हीच केला होता…

नगर दक्षिणची जागा ही पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच आहे. संबंधित मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी दोन ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर उर्वरित चार ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दुसऱया क्रमांकाची मते आहेत. शिर्डीची जागा काँग्रेसकडे असल्याने नगरची जागा राष्ट्रवादीकडे मागण्याचा प्रश्नच नाही. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचा आम्हीच निवडणुकीत पराभव केला होता. या निवडणुकीनंतर विखे पाटील न्यायालयात गेले व केस केली. परंतु त्याठिकाणीही आम्हीच विजयी झालो. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाने आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, आघाडीसाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे योगदान दिलेले नाही. सुजय यांनी राष्ट्रवादीतून लढावे असा प्रस्ताव मांडला गेला. परंतु पक्षातील नेते सोडून नवीन कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा प्रश्नच नव्हता. अहमदनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडणूक लढणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे नेते असून विरोधी पक्षनेते आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती जिल्हा परिषद अध्यक्ष आहे. त्यामुळे ते पुढील काळात नि÷sने काँग्रेस पक्षाचे काम करतील, असा चिमटाही त्यांनी काढला.

Related posts: