|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » निवडणुकीवर बहिष्कार घालून दाखवाच

निवडणुकीवर बहिष्कार घालून दाखवाच 

कबुलायतदार गावकर समितीचे आव्हान

वार्ताहर / आंबोली:

आंबोली कबुलायतदार गावकर जमीनप्रश्नी कबुलायतदार गावकर कृती समितीचा काहीही संबंध नसून फक्त कबुलायतदार गावकर समितीचा संबंध आहे. जमीन प्रश्नी राजकारण करून प्रसिद्धी मिळविणाऱयांनी हिंमत असेल तर निवडणुकीवर बहिष्कार घालून दाखवा, असे आवाहन कबुलायतदार गावकर समितीचे राजेश गावडे यांनी केले. यावेळी कबुलायतदार गवकर समितीचे सत्यवान गावडे, विलास गावडे, बबन गावडे, काशिराम गावडे उपस्थित होते.

1999 साली कबुलायतदार रद्द होऊन महाराष्ट्र शासन जरी लागले असले तरी कबुलायतदार गावकरचे वारसदार म्हणून बोलण्याचा अधिकार आम्हालाच आहे. ज्यांचा गावांशी काहीही संबंध नाही, अशा समितीला आम्ही मानत नाही. निवडणुकीवर बहिष्कार घालणे हा भाजपचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचा ग्रामस्थांशी काहीही संबंध नाही. आम्ही जमिनीसंदर्भात राजकारण करत नसून टीकेला उत्तर देत आहोत, असे ते म्हणाले.

अस्तित्वासाठी भांडवल!

वास्तविक कबुलायतदार गावकर जमीनप्रश्न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोडविणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. पालकमंत्र्यांनीच पहिल्यापासून या प्रश्नाला उचल दिली आहे. हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असताना काही नेते मंडळी आपल्या अस्तित्वासाठी याचे भांडवल करत आहेत.

दीपक केसरकर यांनी स्वखर्चाने या लोकांना मंत्रालयात या प्रश्नासंदर्भात नेले. तेथे काय-काय घडले याचे ते साक्षीदार आहेत. तुम्हाला मान्य नव्हते तर तुम्ही त्यावेळी तसे बोलले पाहिजे होते. आता खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात असे करून दाखवता हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.

महसूलमंत्र्यांनी कल्पना का दिली नाही?

कबुलायतदार गावकर जमिनीसंदर्भातील बैठक केसरकरनी रद्द केल्याचा आरोप करण्यात आला. त्यात काहीही तथ्य नाही. मुळात महसूलमंत्री भाजपचे आहेत. बैठक रद्द करतांना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कल्पना देणे गरजेचे होते. तसे झाले नाही. याला दोषी कोण, असा सवालही यावेळी करण्यात आला.

हा प्रश्न राजकारण न आणता सोडवावा, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही पुढारी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. जमिनीसंदर्भात सर्वांनीच एकसंध राहून हा प्रश्न सोडवू, असे आवाहन राजेश गावडे, सत्यवान गावडे, काशिराम राऊत, विलास गावडे, बबन गावडे यांनी केले.

Related posts: